नगरसेवक संजोग वाघेरे : एक हजार मृत्यूचा अंदाज बांधत खरेदी प्रकरण
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात मागील 45 दिवसांत “करोना’ने पाच बळी घेतले आहेत. तरीही महापालिका प्रशासनाकडून 1000 रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ग्रहीत धरून साहित्य खरेदी केली जात आहे.
यापेक्षा शहरात होणाऱ्या मयत व्यक्तींच्या अंत्यविधीचा सर्व खर्च व मनुष्यबळ महापालिका प्रशासनाने मोफत पुरवावे अशी मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. “करोना’च्या भीतीने करोनाशिवाय इतर कारणामुळे मृत्युमुखी पडलेल्या मृत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी कोणीही मदतीसाठी समोर येत नाही. त्यामुळे करोना संकट संपेपर्यंत महापालिका हद्दीतील होणाऱ्या सर्व मृत व्यक्तींचे अंत्यविधी महापालिका प्रशासनाकडून मोफत व मनुष्यबळ देऊन करावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
काय आहे साहित्य खरेदी प्रकरण?
पिंपरी-चिंचवड शहरात अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने करोनामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि आजपर्यंत बाधितांचे गेलेले बळी आणि पुढील तीन ते सहा महिने करोनाचा प्रसार लक्षात घेता महापालिकेच्या वायसीएम प्रशासनाने मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांसाठीचे साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी एक हजार मयतांचा प्रशासकीय अंदाज समोर ठेऊन ही खरेदी केली जात असल्याने यात एक हजार प्लॅस्टिक पिशव्या व कपड्याची मागणी भांडार विभागाकडे नोंदविण्यात आल्याची समोर आली आहे. त्यानुसार भांडार प्रशासनाने नुकतीच या खरेदीची निविदा प्रसिद्ध करत हे साहित्य खरेदी करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.