कराड -खोडशी, सैदापूर, नडशी, वहागाव, शिरावडे तासवडे बेलवडे, घोणशी, कोपर्डे हवेली या सारख्या वीस गावांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी वरदान ठरलेल्या खोडशी धरणाच्या कामकाजाची पाहणी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली.
खोडशी ता. कराड येथील 18 स्तंभपैकी स्तंभ क्र.1 ते 11 चे संधानक पूर्ण झालेले असून, बंधाऱ्याच्या उजव्या तीरावरील पूरसंरक्षक भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
बंधाऱ्याच्या डाव्या तीरावरील सलुईस चॅनलवरील पूल ही बांधकामे पूर्ण झाली आहेत. स्तंभ क्र. 12 ते 18 चे अंशतः संधानक, रेडियल गेट स्लॉट, टॉप लॉग गेट स्लॉट यामधील दुय्यम संधानक बंधाऱ्याचे डाव्या तीरावरील गाईड वॉल, रेटनिंग वॉल, गाळा क्र.12 मधील ओगी चे अंशतः संधानक तसेच बंधाऱ्यावरील पूर्वराचीत पुलाचे बांधकाम ही कामे अजून शिल्लक आहेत. ना. बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
याप्रसंगी कार्यकारी अभियंता टेंभू आर. वाय. रेड्डीयार, उपविभागीय अभियंता आ. पां. शिंदे, परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती मनीषा अव्हाले, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पंचायत समिती सदस्य पांडुरंग चव्हाण, स्वप्नील जाधव, राहुल पाटील, दादासो पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.