कोपरगाव -कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी सर्व प्रकारच्या योजना राबविल्या. त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असून, मागील एक महिन्यापासून तालुक्यात आजमितीस करोनाचा एकही रुग्ण नाही. तरीही बेसावध न राहता कोपरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसाठी सर्वतोपरी मदत देवू, असे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोपरगाव येथील एसएसजीएम महाविद्यालयाच्या महिला वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची आ. काळे यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून पाहणी केली. कोविड केअर सेंटरमध्ये नागरिकांच्या व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत आरोग्य विभागाने योग्य त्या खबरदारी घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तातडीने संपर्क करा. करोनावर मिळविलेली पकड अजिबात सैल होऊ द्यायची नाही. सर्दी, खोकला, ताप असणाऱ्या नागरिकांनी न घाबरता उपचार करून घ्यावे. थोडासा निष्काळजीपणा आपल्या व कुटुंबाच्या आरोग्याला धोका निर्माण करू शकतो. त्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन आ. काळे यांनी केले.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. संतोष विधाते, डॉ. वैशाली बडदे, एसएसजीएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकरराव थोपटे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गांगुले, नगरसेवक मंदार पहाडे, डॉ. अजय गर्जे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड आदी सोशल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित होते.