आमदार रोहीत पवारांकडून नुकसानग्रस्त पिकांची पहाणी

जामखेड : साकत परिसरातील परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी ,मका, पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी खरीप पिकाच्या नुकसानीची सायंकाळी पाहणी करून तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जामखेड तालुक्यातील साकत, कडभनवाडी, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, हनुमानवाडी, दिघोळ, जातेगाव, माळेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकाला पंधरा दिवसापासून पाऊस असल्याने पीक पाण्यात पोहत आहे. रोज येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पावसातच सोयाबीन काढले. ते काढून त्याची बुचडे लावली मात्र सततच्या येणाऱ्या पावसामुळे पिके सडली व त्याची दुर्गंधी येऊ लागली आहे.

दरम्यान पंचनामे फक्त शेतात उभ्या असणाऱ्या पिकाचेच केले जात आहेत. काही शेतकऱ्यांनी पावसात पिके काढली व त्यांची बुचडे लावली आहेत. ते ही पिके सडून गेली आहेत. त्या पीकाचे पंचनामे करण्यात यावी अशी शेतकऱ्यांनी रोहीत पवार यांच्याकडे मागणी केली. त्यावेळी पवार यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी शासनाची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.

तर शेतात उभे असणारे सोयाबीन पाण्यात सडून चालले आहे. अशा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, प्रा.मधुकर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट, हनुमंत पाटील, अधिकारी सुरेश वराट, कृषी सेवक राणी चव्हाण, तलाठी संजय खेत्रे, सचिन मुरूमकर अॅड. शिवप्रसाद पाटील, सरपंच हरिदास मुरूमकर, माजी सरपंच कांतीलाल वराट, गणेश मुरूमकर, गणेश वराट, बंडू पुलवळे, गणेश आडसुळ ,अदी उपस्थित होते .

 

Leave A Reply

Your email address will not be published.