इनसाईड कांगारू लॅंडस्‌… : ब्रॅडमनच्या कामगिरीची पहिली मालिका संस्मरणीय

– श्रीनिवास वारुंजीकर

या महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मालिका सुरु होत आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियाचा 13 वा दौरा आहे. यापूर्वीच्या कसोटी सामन्यांना वर्ष 1947 मध्ये सुरुवात झाली होती. याचाच अर्थ, भारतीय स्वातंत्र्याला जितकी वर्षे झाली, तितकाच जुना भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यांचा इतिहास आहे.

भारताने वर्ष 2018-19 च्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केले होते, तेही 2-1 ने. त्याव्यतिरिक्त वर्ष 1985-86 ची अनिर्णित मालिका आणि वर्ष 2003-04 मध्ये 1-1 अशी बरोबरीत सुटलेली मालिका वगळता, अन्य 9 मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर वर्चस्व गाजवले आहे. चला तर मग एक धावती नजर टाकूया या लक्षणीय 12 मालिकांवर…

1. ब्रिस्बेन – 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 1947

पहिल्याच कसोटी सामन्यात नवखा भारत चारीमुंड्या चीत झाला. विशेष म्हणजे, गोलंदाजांच्या एका षटकांत 8 चेंडू असायचे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी स्वीकारली आणि कर्णधार सर डोनाल्ड अर्थात डॉन ब्रॅडमनचे शतक (प्रथमश्रेणी क्रिकेटमधील 100 वे शतक) (185 धावा) आणि किथ मिलरच्या 58 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 8 बाद 328 धावांवर घोषित केला. विशेष म्हणजे, ब्रॅडमन या सामन्यात कर्णधार लाला अमरनाथच्या गोलंदाजीवर हिट विकेट बाद झाले. भारताला पहिल्या डावात 58 आणि फॉलो-ऑननंतर 98 धावांत गुंडाळून ऑस्ट्रेलियाने हा सामना 1 डाव 226 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या एर्नी तोषकने 2 धावात 5 आणि नंतर 29 धावांत 6 विकेट्‌स घेत सामन्यात 11 विकेट्‌स घेण्याचा विक्रम केला.

2. सिडनी – 12 ते 18 डिसेंबर 1947

पावसाने तीन दिवस धुमाकूळ घातल्याने धुतली गेलेली ही कसोटी अनिर्णित राहिली. पदार्पण करणाऱ्या दत्तु फडकरचे अर्धशतक (51 धावा) आणि गोगुमल किशनचंदच्या 44 धावांच्या बळावर भारताने 188 धावा केल्या. विजय हजारेंच्या 4 विकेट्‌स आणि दत्तु फडकरच्या 3 विकेट्‌सच्या बळावर भारताने 81 धावांची आघाडी घेत ऑस्ट्रेलियाला 107 धावांत रोखले होते. मात्र, भारताने दुसऱ्या डावात 7 बाद 61 धावा करत ही आघाडी 142 च्या पुढे नेली होती. मात्र, पावसाचे वर्चस्व निर्णायक ठरले.

3. मेलबर्न – 1 ते 5 जानेवारी 1948

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी घेतली. पुन्हा सर डॉन ब्रॅडमन यांनी शतक (132 धावा) आणि लिंड्‌से हॅसेटच्या 80 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 394 धावा केल्या. विनू मांकड आणि लाला अमरनाथ यांनी प्रत्येकी 4 विकेट्‌स घेतल्या. प्रत्त्युत्तरात भारताच्या विनू मांकड यांचे शतक (116) आणि दत्तु फडकर यांचे अर्धशतक (55) याच्या जोरावर भारताने 9 बाद 291 धावांवर आपला डाव घोषित केला. दुसऱ्या डावात पुन्हा ब्रॅडमन यांचे शतक (127) तर ऑर्थर मॉरिसचे नाबाद शतक (100) याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 4 बाद 255 वर डाव घोषित करुन भारतासमोर 358 धावांचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य पार करताना भारताचा डाव अवघ्या 125 धावांत संपल्याने ऑस्ट्रेलियाने 233 धावांनी सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या इयान जॉन्सनने दोन्ही डावांत प्रत्येकी 4 विकेट्‌स घेतल्या.

4. ऍडिलेड – 23 ते 28 जानेवारी 1948

नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी घेतली. पुन्हा एकदा डॉन ब्रॅडमनने आपल्या बॅटची करामत दाखवताना यावेळी द्विशतक झळकावले. (201, 21 चौकार, 1 षटकार) तर लिंडसे हॅसेटने नाबाद 198 धावा करताना 16 चौकार लगावले. त्यातच सलामीवीर सिड बार्न्सने 112 धावा, तर किथ मिलरच्या 67 धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 674 धावांचा डोंगर उभारला. भारताच्या विजय हजारे (116) आणि दत्तु फडकर (123) यांची शतके आणि विनू मांकड यांच्या 49 धावा असूनही भारताला सर्वबाद 381 धावा करता आल्या. फॉलो-ऑन मिळाल्यानंतर पुन्हा विजय हजारे (145) यांचे शतक आणि हेमू अधिकारी (51) यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताला 277 धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या रे लिन्डवॉलने एकहाती 7 विकेट्‌स घेत भारताला नमओहरम केल्याने ऑस्ट्रेलियाने हा सामना 1 डाव 16 धावांनी जिंकला.

5. मेलबर्न – 6 ते 10 फेब्रुवारी 1948

प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाच्या नील हार्वे (153), बिल ब्राऊन (99), सॅम लेक्‍स्टन (80) आणि जखमी निवृत्त झालेले डॉन ब्रॅडमन (57) यांच्या धावांच्या जोरावर 8 बाद 575 धावांवर यजमानांनी आपला डाव घोषित केला. विनू मांकड यांचे शतक (111), विजय हजारेंच्या 74 आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दत्तु फडकर यांच्या 56 धावांच्या बळावर भारताने 331 अशी मजल मारली; पण ते फॉलो-ऑन काही टाळू शकले नाहीत. दुसऱ्या डावात तर भारताने सर्वबाद 67 धावा करत ऑस्ट्रेलियाला सामना एक डाव आणि 177 धावांनी बहाल केला. भारताचे चौघे जण भोपळाही फोडू शकले नाहीत. ब्रॅडमनने मालिकेत 715 धावा केल्या. अखेर ऑस्ट्रेलियाने ही 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.