मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आज भल्या पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्या घऱी छापा टाकला होता. यानंतर नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँण्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून टीका केली आहे.
Today morning the ED had come to @nawabmalikncp saheb’s residence. They accompanied saheb in his vehicle to the ED office. Advocate Amir Malik, Saheb’s son has accompanied saheb along with.
— Office of Nawab Malik (@OfficeofNM) February 23, 2022
या प्रकरणाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले,” ”यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचं हे उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे घडेल. कारण, नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही,” असे शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
“काही झालं तर आणि विशेषकरुन मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचे नाव घेतले जातं. मी राज्याचा मुख्यमंत्री असतानाही असा आरोप झाला होता. त्यावेळीही असंच वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. त्याला आता २५ वर्ष झाली. पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, लोकांना त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करण्याचं काम सुरु आहे. जे लोक केंद्र सरकारविरोधात तसंच विरोधात वापरल्या जाणाऱ्या तपास यंत्रणांविरोधात जे भूमिका मांडतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न असून तेच घडलं आहे,” असंही शरद पवार म्हणाले.