मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आज भल्या पहाटे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे.जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मलिकांवर ईडीने चौकशी लावल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय यंत्रणांची मनमानी गेले काही महिने महाराष्ट्रात सुरु आहे त्याचा पुढचा अंक म्हणून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री मा.नवाबजी मलिक साहेब यांच्यावरील कारवाईकडे पाहता येईल.१/२#nawabmalik @nawabmalikncp @NCPspeaks
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 23, 2022
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, केंद्रीय यंत्रणांची मनमानी गेले काही महिने महाराष्ट्रात सुरु आहे त्याचा पुढचा अंक म्हणून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावरील कारवाईकडे पाहता येईल. केवळ राजकीय सूडबुद्धीने संबंधित व्यक्तीच नाही तर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांची सुद्धा ईडी चौकशी करते.
नवाब मलिक सातत्याने इडी,एनसीबी वगैरेंच्या विरोधात निडरपणे बोलताहेत, त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे.परंतु नवाब मलिक किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अशा कारवायांनी दबून जाणार नाही. ईडी ला चौकशी करायची असू शकते परंतु राज्याच्या मंत्र्याच्या घरी पहाटे ईडी ची टीम जाते, यावरून त्यांचा हेतू दिसून येतो. विशेष म्हणजे भाजपाच्या एकाही व्यक्तीच्या विरोधात ईडीची कारवाई नाही. असेही त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, पहाटे पाच वाजताच ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घऱी पोहोचले होते. यानंतर त्यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आलं असून चौकशी सुरु आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँण्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे.