सासवड – प्रजासत्ताकदिनी गिर्यारोहक नितीन जाधव, रॉबिन हिंगणे करांनी अभिनव उपक्रम राबविला. दिवे येथील गिर्यारोहक नितीन जाधव व पुणे येथील गिर्यारोहक रॉबिन हिंगणेकर आणि त्यांच्या टीमने मावळ तालुक्यातील ४०० फूट उंचीचा आकाशाला भिडणारा, छातीत धडकी भरवणारा, सह्याद्रीतील ढाक-बहिरी किल्ल्याच्या शेजारील 400 फूट उंचीचा कळकराय सुळका अवघ्या तीस मिनिटात सर केला.
दिवे येथील अंजीर उत्पादक तज्ज्ञ नितीन जाधव आणि पुणे येथील हिंगणेकर यांनी यापूर्वी सह्याद्रीतील बऱ्याच मोहिमा एकत्र सर करत फत्ते केल्या आहेत. दरवर्षी ते अभिनव उपक्रम राबवित आहेत. यावर्षी त्यांनी कळकराय सुळका आरोहण करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांनी दि. 26 ला सकाळी जांभिवली गावातून ट्रेकिंगला सुरुवात केली. जांभिवली गावातून सुळक्यापर्यंत जान्यासाठी त्यांना सुमारे दीड तास लागले. सकाळी आठ वाजता ते सुळक्याच्या पायथ्याला पोहोचले. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर त्यांनी आठ वाजता कळकराय सुळका क्लाइंबिंगला सुरुवात केली. या सुळक्याला एकूण तीन टप्पे क्लाइंबिंग केले जाते.
पहिला टप्प्यातले क्लाइंबिंग साधारण प्रकारात मोडले जाते दूसरा आणि तिसरा पॅच आरोहन करताना शारीरिक आणि मानसिक कसोटी पणाला लागते. दुसऱ्या टप्प्यावर ट्रावर्स (वळसा) मारून साधारण चाळीस फुटाचा पॅच आरोहन करावा लागतो. येथे पोचल्यावर तुम्हाला उजव्या साईडला खोल दरीचे दर्शन होते हे सर्व तिन्ही टप्पे त्यांनी तीस मिनिटांत आरोहण यशस्वीरित्या पूर्ण केले. या टीमने कळकरायचा सुळक्यावर तिरंगा फडकावून मानवंदना दिली.
मोहिमेत एकूण पंधराजणांचा सहभाग होता. या मोहिमेचे आयोजन सह्याद्रीचे वाटाडे आणि एक्सप्लोरर पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते. मोहिमेत कोल्हापूरचे प्रतीक मस्कर, सासवड येथील सागर झिंजुर्के, एक्सप्लोरर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आनंद केंजळे, सुनील गुजर यांनी त्यांना मोलाची साथ दिली. कोकण आणि घाट माथ्यावरील भागावर लक्ष देणारा ढाक गड आणि त्याच्या शेजारी जवळपास ४०० फुटाचा आकाशाला भिडणारा, छातीत धडकी भरवणारा,कळकराय सुळका .कळकराय सुळक्याच्या माथ्यावरुन मनोरंजन दुर्ग श्रीवर्धन दुर्ग, ड्युक्स नोज, लोणावळा परिसर असे सह्याद्रीतले विहंगम दृश्य स्वर्गसुख पाहण्यासारखे आहे.