पुणे -ग्रामीणमध्ये आजपासून गर्भवतींना करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरवात झाली. दिवसभरात 31 महिलांना लस देण्यात आली असून त्यांच्यासाठी केंद्रावर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यासह राज्यात मागील सहा महिन्यांपासून करोना संसर्गावर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू आहे. टप्याटप्याने हे लसीकरण सुरू असून, पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि कर्मचारी, दुसऱ्या टप्यात फ्रंट लाइन वर्कर, तिसऱ्या टप्प्यात साठ वर्षापुढील आणि 45 ते 60 वयोगटाटील आजारी व्यक्ती.
त्यानंतर चौथ्या टप्प्यात 45 वयोगटापुढील सर्व व्यक्ती. त्यांतर 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्वांना लसीकरण सुरवात झाली. त्यामध्ये गर्भवती महिला, स्तनदा माता आणि लहान मुले (1 दिवस ते 18 वर्षे) यांच्या लसीकरणाला अद्याप सुरवात झाली नव्हती.
मात्र, 19 जूनपासून स्तनदा मातांना लसीकरण करण्याबाबत सूचना आल्या. तर आता 1 जुलैपासून गर्भवती महिलांनाही लसीकरणाबाबत केंद्र शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीणमधील सर्व माहिती एकत्र करून, गर्भवती महिलांना लसीकरण करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी,
कोणत्या गोष्टींची माहिती घेऊन लसीकरण द्यावे. त्यासाठी कशाप्रकारची व्यवस्था असावी, याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर शुक्रवार (दि. 9 जुलै) पासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे.
त्यामध्ये आंबेगाव तालुक्यात 1, दौंडमध्ये 16, पुरंदर येथे 5 तर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे 9 महिलांनी लस घेतली. दरम्यान, ससून रूग्णालयात आज (दि. 10) पासून गर्भवती महिलांना लस देण्यास सुरवात होणार असल्याचे ससून रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ग्रामीणमध्ये आजपासून गर्भवती महिलांच्या लसीकरणाला सुरवात झाली. सायंकाळपर्यंत 30 हून अधिक महिलांचे लसीकरण पूर्ण झाले. लसीकरणाबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. टप्या टप्याने त्यामध्ये वाढ करण्याबाबत सर्व केंद्रांना सूचना देण्यात आल्या आहेत.
डॉ. सचिन एडके, जिल्हा लसीकरण अधिकारी