बेल्हे (पुणे) – आळे (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला दोन सख्ख्या भावांनी अमानुष मारहाण केली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि.12) कामबंद आंदोल करून निषेध नोंदविला.
सुनील भिकाजी गुंजाळ (वय 35 रा. आळे) असे मारहाण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे तर धनंजय विजय काकडे, मंदार विजय काकडे (रा. आळेफाटा, ता. जुन्नर) असे तक्रार दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील गुंजाळ हे बुधवार (दि.11) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कचरा जमा करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर (एमएच 14 सीएल 0278) घेऊन आळेफाटा येथील शुभम तारांगण सोसायटीमध्ये गेले होते. तिथे धनंजय गुंजाळ बंद गोणीत असलेला कचरा ट्रॅक्टरमध्ये टाकत असताना गुंजाळ यांनी त्यास गोणीचे तोंड उघडून कचरा टाका असे सांगितले.
गोणीचे तोंड उघडण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला त्यावेळी मंदरापण तिथे आला व या दोघांनी मिळून गुंजाळ यांना पाइप व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे. दरम्यान, ही घटना समजताच ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वनघरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कर्मचाऱ्याला दवाखान्यात दाखल केले. तर ग्रामपंचायतीमधील 18 ही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते.
- नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये काहीही समस्या असेल तर ग्रामपंचायतीमध्ये येऊन रीतसर तक्रार द्यावी. बुधवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते; परंतु दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी काम पुन्हा सुरू केले आहे.
– बाळासाहेब नवघरे, ग्रामविकास अधिकारी