प्रभात प्रभाव
कोरेगाव भीमा (पुणे)-येथील प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने अपंग निधी जमा न केल्यास एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याबाबतचे वृत्त प्रभात वृत्तपत्रामध्ये 8 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची तात्काळ दखल घेत व अपंगांच्या समस्या, अडचणी आणि समस्या समजून घेत ग्रामसेवक गुलाब नवले यांनी तात्काळ निधी उपलब्ध केल्याने कोरेगाव भीमा येथील 39 अपंगांची दिवाळी गोड झाली आहे.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने 12 नोव्हेंबरला आंदोलन करण्यात येणार होते. याची तात्काळ दखल ग्रामप्रशासन आणि पोलीस प्रशासनाने घेतली.
अपंगांच्या अडीअडचणी व समस्या समजून घेत त्यातून तात्काळ मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये पत्रकार बांधव, ग्रामसेवक गुलाबराव नवले व सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी अपंगांच्या निधीचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली. निधी जमा करण्यात आल्याने, सर्व बांधवांची दिवाळी गोड झाल्यानेयाबाबत आभार मानत आनंद व्यक्त केला. अपंगांच्या खात्यावर त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केल्याची माहिती नवले यांनी दिली.
- अपंगांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी जमा केल्याने आम्ही समाधानी असून पत्रकार बांधव व ग्राम प्रशासन यांचे विशेष आभार व अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने मदत करणाऱ्या सर्वांचे आभार.
-कुंडलिक वायकुळे, उपाध्यक्ष, शिरूर तालुका प्रहार अपंग क्रांती आंदोलन समिती - दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण असून कोरेगाव भीमा येथील अपंगांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केला. सर्व अपंग बांधवांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये जमा केले आहेत. अपंगांना यापुढे अडचण येणार नाही यासाठी प्रयत्न करणार असून अपंग बांधवांनी निधी उपलब्ध नसल्याचे समजल्यावर जी सामंजस्याची भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचे आभार.
-गुलाब नवले, ग्रामसेवक कोरेगाव भीमा