पाथर्डी -पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील 45 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीच्या स्त्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तालुक्यात प्रथमच पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने उद्या (दि. 3) पाथर्डीमधील अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आले असल्याचे आज प्रशासनाने घोषित केले. दरम्यान, ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेल्याचे स्पष्ट झाले असून, त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 44 झाली आहे.
दरम्यान, गेल्या 5-6 दिवसांनंतर जिल्ह्यात पुन्हा करोनाबाधित व्यक्ती आढळून आल्याने जिल्ह्याच्या सीमेवरील नाकेबंदी कडक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. जामखेड, संगमनेर, नेवाशानंतर पाथर्डी तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात एकही करोनाबाधित रुग्ण आढळा नव्हता. त्यामुळे नगरचा ऑरेज झोनमध्ये समावेश होईल, अशी अशा नगरकरांना होती. मात्र, आज पाथर्डी तालुक्यात एक करोनाबाधित सापडल्याने नगर रेड झोनमध्ये जाईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1 हजार 513 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1 हजार 431 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्हव आले होते.