भिगवण – इंदापूर तालुका कोव्हिड 19 च्या साथीपासून दूर होता. मात्र, मंगळवारी (दि. 28) भिगवण परिसरातील एक महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्याचे धाबे दणाणले आहेत. रुग्ण आढळलेल्या ठिकाणापासूनचा 5 किलोमिटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे. तर आरोग्य विभागाच्या आठ पथकांद्वारे परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनसुद्धा कामाला लागले असून “बारामती पॅटर्न’ नुसार भिगवण परिसरात काम करण्याचे ठरविण्यात आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले.
संबंधित महिला आजारी असल्याने भिगवण येथील दोन हॉस्पिटलमध्ये उपाचर घेतले. मात्र, प्रकृतित सुधारणा न झाल्याने ती बारामती येथे गेली. पण तिचे लक्षणे करोनाचे दिसत असल्याने तिला पुण्यात जाण्यास सांगितले. तिथे तिची चाचणी केली असता ती करोना संक्रमित असल्याचे मंगळवारी सिद्ध झाल्याने भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्र सतर्क झाले आहे.
13 जण क्वारंटाइन
करोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील पाच सदस्यांना इंदापूर येथे क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्या स्वॅबचे नमुने पुण्यात पाठविले जाणार आहे. त्याचबरोबर रुग्णाशी संबंध आलेल्या इतर आठ व्यक्तींनानाही क्वारंटाइन केले जाणार आहे. भिगवण येथील दोन हॉस्पिटलमध्ये या रुग्णास तपासले गेल्याची माहिती मिळाल्याने ते हॉस्पिटलही सील केले असून हॉस्पिटलमधील डॉक्टरांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. करोना पॉझिटिव्ह रुग्णास तपासले नंतर आलेल्या रुग्णांची माहिती घेतली जाणार आहे.
भिगवण परिसरातील एक महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्याने आम्ही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण परिसरास या साथीस रोखण्यास उपाययोजना करीत आहोत.- डॉ. अमित उदावंत,
आरोग्य अधिकारी, भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्र