नारायणगाव -वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नारायणगावात 2 रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले असून, धनगरवाडी येथे 1 रुग्ण आणि धालेवाडी येथील 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे, तर नारायणगाव येथून एका व्यक्तीला संशयित म्हणून लेण्याद्री कोव्हिड केंद्रात पाठविले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.
नारायणगाव शहरात शनिवारी (दि. 4) दोन व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचा तपासणी अहवाल होता. यामध्ये 2 जुलैला हनुमान चौकातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील एक तरुण व खोडद रस्त्यावरील एक महिला आरोग्य कर्मचारी आढळून आले होते. या दोघांच्या संपर्कातील दोन जणांचा अहवाल सोमवारी (दि. 6) रात्री उशिरा आला आहे. या अहवालामध्ये एका महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे पती आणि तरुणाचा भाऊ यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत.
नारायणगाव शहरात एकूण 5 रुग्ण करोनाबाधित सापडले असल्यामुळे आज (दि. 7) पासून नारायणगाव शहरातील सर्व बॅंका, पतसंस्था, शासकीय कार्यालये पुढील 14 दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे लेखी आदेश नारायणगाव ग्रामपंचायतीने सर्वांना दिले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ आणि सरपंच योगेश पाटे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, सर्वांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.