बंगळुरू – दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोन प्रवाशांना करोनाची बाधा झाली होती. त्यापैकी एकाला डेल्टापेक्षा वेगळ्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला असल्याची माहिती कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे.
या परदेशी नागरिकांत आढळलेल्या व्हेरिएंटबाबत भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे स्पष्टता कर्नाटक सरकारने मागवली आहे. हा व्हेरिएंट ओमिक्रोन असल्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.आमचे आयसीएमआर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे. डेल्टापेक्षा वेगळ्या विषाणूचा संसर्ग झालेला एक 63 वर्षीय संसर्गित आढळला आहे. आयसीएमआरशी संपर्क साधला असून त्यांच्याकडून संध्याकाळपर्यंत तपशील मिळण्याची शक्यता आहे.
बंगळुरू जिल्हा प्रसासनाने शुक्रवारी दोन्ही बाधितांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी द.आफ्रिकेत आढळणाऱ्या ओमिक्रोन विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे सांगितले होते.
मी माझ्या सहकाऱ्याशी बोललो आहे. माझी द. आफ्रिकेसह परदेशातील काही तज्ज्ञांशी चर्चा झाली आहे. ओमिक्रोनच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, हा वेगाने पसरतो. मात्र, तो डेल्टासारखा गंभीर नाही. त्याने आजाराचे तीव्र स्वरूप धारण करत नाही, असेही सुधाकर यांनी सांगितले.