मुंबई, – राज्याचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आल आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपासून मुंबईमध्ये होणार आहे. दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबरदरम्यान असणार आहे.
हा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक दि. 24 डिसेंबर 2021 रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
अधिवेशन वाढवायचं किंवा नाही याचाही विचार केला जाईल, असे राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. या हिवाळी अधिवेशनात एकूण 12 विधेयके असणार आहेत. तर तारांकित प्रश्नांसंदर्भात गुरुवारी सभापती यांच्याकडे बैठक होणार आहे, असे परब यांनी सांगितले.
अनिल परब म्हणाले, 24 डिसेंबरला पुन्हा बैठक घेऊन अधिवेशन वाढवायचं किंवा नाही यावर निर्णय होईल. तसेच ज्यांचे दोन डोस झाले आहेत त्यांनाच अधिवेशनामध्ये प्रवेश मिळणार आहे, असे परब यांनी सांगितले.