एक हजार 782 महिलांमध्ये 192 जणींना करोना असल्याचे निष्पन्न
सागर येवले
पुणे – मातृप्रेमाच्या असंख्य कहाण्या सांगितल्या जातात. पण, आपल्याच रक्तामांसाचा गोळा असणाऱ्या बाळाला आपल्यापासून करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्या माता सजग असल्याचे स्पष्ट झाले. ससून रुग्णालयात 153 करोनाबाधित गर्भवतींनी जन्म दिलेल्या 137 बाळांना करोनाचा संसर्ग झाला नाही. तर बाधित 16 बाळांपैकी 14 अर्भके बरे होऊन सुखरूप घरी गेली आहेत. अन्य दोन बाळांवर उपचार सुरू आहे.
बाळंतपण म्हणजे त्या आईचा पुनर्जन्मच; आई होण्याचा आनंद त्या मातेसाठी आणि कुटुंबासाठी जगातील सर्वोच्च आनंद असतो. “सोनियांच्या पावलांनी नंदगोपाळ कधी घरात येतोय’, या आतुरनेते सर्व कुटुंबातील मंडळी उत्सुक असतात. मात्र, यंदा या आनंदावर करोनाने विरजण घातले आणि बाळंतपण होऊन आई आणि बाळ सुखरूप घरी येईपर्यंत कुटुंबाची धाकधूक सुरूच राहते.कारण, करोनाचा सर्वाधिक धोका वयोवृद्ध व्यक्तींबरोबरच गर्भवती माता आणि लहान मुलांना अधिक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. नियमित तपासणी, सोनोग्राफीसाठी दवाखान्यात येता-जाता करोनाची लागण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. प्रसूतीसाठी ससूनमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलेची रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट आणि स्वॅब तपासणी केली जाते. त्याचबरोबर जन्मानंतर बाळाचीही करोना तपासणी केली जाते. शहरात करोनाने मार्च महिन्यात शिरकाव केला. तेव्हापासून ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत ससूनमध्ये एकूण 1 हजार 782 गर्भवती महिलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यामध्ये 192 गर्भवतींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 84 गर्भवती संशयीत तर 1 हजार 506 गर्भवतींना कोणताही त्रास नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून स्क्रिनिंग केलेल्याच्या तुलनेत केवळ 10 टक्के गर्भवतींचा अहवाल पॉझीटीव्ह आला.
प्रसुतीसाठी ससूनमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलेची प्रसुती ही नॉर्मल करण्यासाठी स्त्री-रोग विभागातील डॉक्टरांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच या 153 पैकी 90 प्रसुती ह्या नॉर्मल करण्यात आल्याची माहिती स्त्री-रोग विभागाकडून देण्यात आली.
…आईप्रमाणे माया लावल्यामुळे सर्व बाधित बाळ सुखरूप
करोना संसर्गात ससून रुग्णालयात आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या बहुतांश बाळांना कावीळ किंवा अन्य त्रास होते. त्या बाळांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवले होते. बाळाची हालचाल, त्याच्या हृदयाचे ठोके डोळ्यात तेल घालून पाहणे, त्याला दूध देणे हे काम डॉक्टर आणि येथील परिचारिका करत होते. त्याच्या मायेच्या स्पर्शामुळेच आतापर्यंत 14 अर्भके सुखरूप घरी गेले आहेत.