आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
पुणे – राज्यातील वाढती करोनाबाधितांची संख्या आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, करोनाची लक्षणे असलेल्या तसेच बाधितांच्या संपर्कात आलेल्या जवळील व्यक्तींची करोना चाचणी करण्यासाठी संबंधित रुग्णांची तीन गटांत विभागणी केली जाणार आहे. त्यानुसार, कोणत्या गटातील रुग्णांची रॅपीड ऍन्टिजेन टेस्ट करायची तसेच कोणाची आरटीपीसीआर टेस्ट करायची हे राज्याच्या आरोग्य विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे.
त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सर्व शासकीय महाविद्यालये, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी या सूचना पाठविल्या आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांमध्ये तसेच जिल्ह्यांमध्ये एकाच करोनाबाधित रुग्णांच्या दोन ते तीन चाचण्या करण्यात येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे ही मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत.
आता प्रवाशांची चाचणी नाही
मार्गदर्शक सूचनांसोबतच बाहेरच्या जिल्ह्यातून दाखल होणाऱ्या व्यक्ती, प्रवास करणाऱ्या व्यक्ती तसेच व्यापाऱ्यांना लक्षणे नसल्यास त्यांचीही कोविड 19 ची चाचणी करू नये, असेही या सूचनांमध्ये नमूद केले आहे. तसेच तुरुंगात दाखल होणारे कैदी आणि मनोरुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची तातडीने करोना चाचणी न करता त्यांना एक आठवडा विलगीकरणात ठेवण्यात यावे त्यानंतरच त्यांची ऍन्टिजेन चाचणी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
असे आहेत नवे नियम
ज्या व्यक्तींना उपचाराची तातडीची गरज आहे अशांची ऍन्टिजेन चाचणी करण्यात यावी
आरटीपीसीआर चाचणी करताना ज्यांची ऍन्टिजेन चाचणी नकारात्मक आली आहे मात्र, संबंधिताला करोनाची लक्षणे आहेत. तसेच करोनाबाधित व्यक्तींच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलेली व्यक्ती आणि परदेशातून आलेले नागरिक यांचीच करण्यात यावी
उपचारापूर्वी मृत पावलेले व्यक्ती, बाळंतपणासाठी आलेल्या माता, तातडीचे ऑपरेशन करण्याची गरज असलेले रुग्ण यांची ट्रू नेट चाचणी करण्यात यावी तसेच ट्रू नेट चाचणीची सोय नसल्यास रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात यावी