शिक्रापूर – येथे गर्भवती महिलेसह दोघांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एका कंपनीचा कामगार ठेकेदाराने खबरदारी म्हणून स्वतःची कारोना तपासणी केली असता त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दुसरी महिला व तिचे पती सध्या नोकरी निमित्ताने चाकण परिसरात वास्तव्यास आहेत.
मात्र, ते सध्या शिक्रापूर येथे घरी आलेले असताना महिला गर्भवती असल्याने तिला प्राथमिक तपासणीसाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी प्रथम करोना तपासणीचा सल्ला दिला. तर त्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा यांसह आदींनी दोन्ही रुग्णांच्या घरा जवळील सर्व परिसर ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करत निर्जंतुकीकरण केला आहे.
त्यांनतर दोन्ही रुग्णांच्या संपर्कात असलेल्या तीन जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असून या दोघांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची माहित संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, शिक्रापूर परिसरातील नागरिक अद्यापही भीतीच्या छायेत वावरत आहे.