अंकुश महाडिक
साईकडे ग्रामस्थांचा आरोप
सणबूर – स्वच्छ सुंदर डिजिटल शाळेचा नारा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. साईकडे ता. पाटण येथील प्राथमिक शाळा मात्र यास अपवाद असल्याचे दिसते. खूप सुंदर परिसर लाभलेल्या या शाळेला मिळालेले खेळाचे मोठे मैदान कदाचित अपवादात्मक शाळांनाच मिळाल्याचे दिसते. मात्र शाळेच्या मैदानात वाढलेले गवत आणि शाळेचा अस्वच्छ परिसर पाहून असे वाटते की, स्वच्छ सुंदर डिजिटल शाळेचा नारा कदाचित साईकडे गावातील शाळेपर्यंत पोहोचलाच नाही. या शाळेकडे ग्रामपंचायती बरोबरच शिक्षण संस्था, शिक्षण विभाग यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
या प्राथमिक शाळेचा परिसर पाहिला तर स्वच्छतेच्या बाबतीत ही शाळा नापास असल्याचे दिसते. ज्या पाटण तालुक्यातील दुर्गम डोंगर पठारावरील अनेक शाळा स्वच्छतेच्या आणि गुणवतेच्या बाबतीत महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अव्वल आलेल्या असताना मात्र याच तालुक्यातील साईकडे सारख्या सखल आणि तळमावले सारख्या बाजारपेठे जवळ असणाऱ्या गावातील हे चित्र मात्र खूप विलक्षण विरोधीभासाचे आहे.
मुळात ज्या प्राथमिक शाळेत आपली लहान मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना सुरक्षित दर्जेदार शिक्षण मिळते का? शाळेचा परिसर स्वच्छ आहे का? याबाबत गावातील पालक वर्ग, ग्रामशिक्षण समिती आणि विशेषतः ग्रामपंचायत जागरूक असणे गरजेचे आहे. मात्र त्यांचेही याकडे दुर्लज्ञ होताना दिसत आहे.
साईकडे प्राथमिक शाळेची अवस्था पाहिल्यास ग्रामस्थांचे, ग्रामशिक्षण समितीचे आणि विशेषतः ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसते. यावर्षी सर्वत्रतच पावसाने थैमान घातले होते. अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली होती. मात्र पूर ओसरल्यानंतर सर्वांनी स्वच्छतेचा नारा दिला होता. त्यात काही शाळांचाही सहभाग होता. मात्र साईकडे शाळा त्याला अपवाद आहे. या शाळेच्या मैदानात डोक्याएवढे गवत वाढले आहे. या गवतामध्ये साप, विंचू यासारख्या विषारी प्राण्यांमुळे लहान मुलांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करून ग्रामपंचायतीने शाळेच्या समोरील मैदानातील आणि शाळेकडे जाणाऱ्या वाटेतील किमान गवत तरी काढावे अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.