कवठे – खंबाटकी घाट उतरताना एका वळणावर ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शिवाजी शंकर शेडगे (वय 76, रा. शाहूपुरी, सातारा) यांचा अपघाती मृत्यू झाला. ते माजी सैनिक होते.
अधिक माहिती अशी, शनिवारी सकाळी अपघाग्रस्त दोन्ही वाहने पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना खंबाटकी घाटाच्या उतारावर ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटून तो समोरच्या दुचाकीवर जाऊन आदळला. या अपघातात दुचाकी चालवत असलेले माजी सैनिक शिवाजी शेडगे यांचा जाग्यावरच मृत्यू झाला.
या अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रक तिथेच सोडून घटनास्थळावरून पलायन केले. अपघाताची माहिती समजताच पोलीस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. अपघातातील मृतदेह कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. सदरच्या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास चालू आहे.