डॉमिनिका – वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण केलेल्या भारताच्या यशस्वी जयस्वालने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर विक्रमांचे नवनवे इमले रचले आहेत.
परदेशी भूमीवर सलामीवीर म्हणून शतक लगवणारा जयस्वाल पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सुधीर नाईकने इंग्लंडमध्ये (1974) 77 धावा केल्या होत्या. तर विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी पदार्पण करताना 65 धावांची खेळी केली होती. भारतात पदार्पण करताना शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी शतकी खेळी केली आहे.
जयस्वाल मात्र पदार्पणाच्या कसोटीत शतक साकार करणारा 17 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. पदार्पणाच्या कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम धवनच्या नावावर आहे. त्याने 2013 साली मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 187 धावांची खेळी केली होती.
कसोटी पदार्पणात शतक झळकावणारे तरुण भारतीय..
– पृथ्वी शॉ (18 वर्षे 329 दिवस) विरुद्ध वेस्ट इंडीज, 2018
– अब्बास अली बेग (20 वर्षे 126 दिवस) विरुद्ध इंग्लंड, 1959
– गुंडप्पा विश्वनाथ (20 वर्षे 276 दिवस) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1969
– यशस्वी जयस्वाल (21 वर्षे 196 दिवस) विरुद्ध वेस्ट इंडीज, 2023
– महंमद अझरुद्दीन (21 वर्षे 327 दिवस) विरुद्ध इंग्लंड, 1984
विंडीजविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक लगवणारे भारतीय…
– रोहित शर्मा, 177, कोलकाता, 2013
– पृथ्वी शॉ, 134, राजकोट, 2018
– यशस्वी जयस्वाल, नाबाद 143 धावा, डॉमिनिका, 2023
सचिनच्या कामगिरीला टाकले मागे….
जयस्वाल देशांतर्गत क्रिकेटमध्ये 80.21 अशा भक्कम सरासरीसह भारतीय संघात कसोटी पदार्पण करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. जेव्हा सचिनने भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले होते, त्यावेळी त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील सरासरी 70.18 होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये 88.37 या सरासरीने सर्वाधिक धावा करून कसोटी पदार्पण करण्याचा विक्रम विनोद कांबळीच्या नावावर आहे.
पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारे भारतीय…
शिखर धवन – 187 धावा
रोहित शर्मा – 177 धावा
यशस्वी जयस्वाल – नाबाद 143 धावा
गुंडप्पा विश्वनाथ – 137 धावा
पृथ्वी शॉ – 134 धावा
सौरव गांगुली – 131 धावा
सुरिंदर अमरनाथ – 124 धावा
सुरेश रैना – 120 धावा
लाला अमरनाथ – 118 धावा
अब्बास अली बाग – 112 धावा
दीपक शोधन – 110 धावा
मो. अझरुद्दीन – 110 धावा
हनुमंत सिंग – 105 धावा
वीरेंद्र सेहवाग – 105 धावा
श्रेयस अय्यर – 105 धावा
प्रवीण अमरे – 103 धावा
किरपाल सिंग – नाबाद 100 धावा
21 वर्षे जुन्या भागीदारीचा विक्रमही साकारला…
रोहित आणि यशस्वी या दोघांनी वेस्ट इंडीजविरुद्ध भारताकडून सलामीसाठी सर्वात मोठी भागीदारी केली आहे. या सामन्यात त्यांनी 229 धावांची सलामी दिली. त्यांनी वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर यांच्या 2022 साली वेस्ट इंडीजविरुद्ध मुंबईत केलेल्या 201 धावांच्या सलामीच्या कामगिरीलाही मागे टाकले.
जयस्वालने मोडला गांगुलीचा विक्रम…
सौरव गांगुलीने 1996 साली लॉर्डसवर इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात 131 धावांची खेळी केली होती. आता जयस्वालच्या नावावर परदेशात पदार्पण करणाऱ्या भारतीयाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
आघाडीचाही विक्रम…
एकही गडी न गमावता प्रतिस्पर्धा संघावर आघाडी घेण्याचा विक्रमही याच सामन्यात घडला. भारतीय संघाचे पहिल्या डावात वेस्ट इंडीजने केलेल्या 150 धावांना मागे टाकताना एकही गडी गमावला नाही. यापूर्वी 1978 सालच्या सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 131 धावांवर अटोपल्यावर गावसकर आणि चेतन चौहान यांनी 97 धावांची सलामी दिली होती.
2008 सालानंतर सलामीवीरांची शतके…
रोहित आणि जयस्वाल यांच्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या फिल जॅक व सायमन कॅटिच यांनी 2008 साली वेस्ट इंडीजविरुद्ध ब्रिजटाऊन कसोटीत दुसऱ्या डावात शतके फटकावली होती. त्यानंतर विंडीजविरुद्धच्या एकाच कसोटी डावात सलामीवीर फलंदाजांनी शतके साकार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.