मुंबई – दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. आपल्या चित्रपटातील दमदार ऍक्शन सीनसाठी तो ओळखला जातो. चित्रपट सुपरहिट होण्यासाठी रोहित शेट्टी कधी चारचाकी कार्स उडवतो तर कधी बसेस फोडतो. कॉमेडीसह ऍक्शनचा तडका दिल्याशिवाय रोहित शेट्टीचा चित्रपट पूर्ण होत नाही. गोलमाल, संडे, सिंघम, सिम्बा असे अनेक सुपरहिट चित्रपट रोहितने प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहेत. मात्र रोहितचा ‘सर्कस’ हा चित्रपट अपयशी ठरला. याबाबत त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत रोहित शेट्टी म्हणाले की, “यश किंवा अपयश स्वीकारण्यात कोणताही कमीपणा नाही वाटला पाहिजे. ‘सिंघम’, ‘गोलमाल’ हे चित्रपट सुपरहीट ठरले ते माझेच आहेत, पण ‘दिलवाले’, ‘जमीन’, ‘सर्कस’सारखे चित्रपट अयशस्वी ठरले, तरीही ते माझेच चित्रपट आहेत. एखादा चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्यासाठी इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो.”
दरम्यान, विनोदी मसाला ‘सर्कस’ हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाला सिनेरसिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. शुक्रवार दि. 23 डिसेंबर 2022 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 7 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केला होते. दरम्यान, ‘सर्कस’ या विनोदी मसाला चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग सोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, जॉनी लीव्हर, मुरली शर्मा, सुलभा आर्य, सिद्धार्थ जाधव देखील मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत.