नवी दिल्ली – मुंबई इंडियन्सकडून खेळणारा सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या भारतीय फलंदाजाची दुखापत गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही बाहेर जाऊ शकतो.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. हे सामने 9 जून ते 19 जून दरम्यान खेळवले जातील. सूर्यकुमारला दुखापतीमुळे पुढील चार आठवडे क्रिकेटच्या मैदानाबाहेर राहावे लागू शकते. त्यानुसार दक्षिण आफ्रिका मालिकेत त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.
सूर्यकुमार यादवच्या डाव्या हाताच्या स्नायूला दुखापत झाली आणि दुखापत गंभीर असल्याने तो मोसमातून बाहेर पडला. 6 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती.
आयपीएलपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान सूर्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संघाचा भाग नव्हता. दुखापतीमुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर व्हावे लागले होते.