पुणे – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसे डकवर्थ-लुईस या क्रिकेटशी संबंध नसलेल्या व्यक्तींनी तयार केलेली गणित पद्धती वापरी जाते. त्याच्याच कित्ता चेन्नईची खेळपट्टी बनवत असलेल्याने गिरवला आहे. तरुणपणात एकधावपटू व सध्या कपड्यांचा व्यापारी असलेला रमेश कुमार चेन्नईतील चेपॉक मैदानाची खेळपट्टी तयार करत आहे. त्यामुळे येथे येत्या शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या भारत व इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत खेळपट्टी कशी असेल यावर चर्चा सुरू झाली असून त्यावरुन वादही घडले आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या एका सदस्याने दिली आहे.
ज्या व्यक्तीने क्युरेटर म्हणून काम करण्यापूर्वी पिच मेकिंगचे अधिकृत शिक्षण घेतलेले आहे, तसेच त्याच्याकडे पुरेसा अनुभव आहे अशाच व्यक्तीला आंतरराष्ट्रीय सामन्याची खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी दिली जाते. बीसीसीआयसाठी हे काम धिरज परसाना हे गेली जवळपास तीन दशके करत होते. मात्र, असे कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना तसेच यापूर्वी प्रथम दर्जाच्या सामन्यासाठीही खेळपट्टी तयार केलेली नसताना रमेश येथील मैदानाची खेळपट्टी तयार करत आहेत. त्यामुळे ही खेळपट्टी कशी असेल तसेच त्याचा दर्जा कसा असेल व त्यावर फलंदाज तसेच गोलंदाज कशी कामगिरी करतील, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. एकूणच सगळाच गोंधळ असल्याचेही स्पष्ट दिसत आहे.
रमेश तरुणपणात नावाजलेले धावपटू होते. तमिळनाडूकडून त्यांनी 110 मीटर धावण्याचा शर्यतीमध्ये यशही मिळवले आहे. तसेच ते राज्याच्या रिले संघाचेही सदस्य होते. रमेश यांनी 1996 साली दोन राष्ट्रीय पदकेही जिंकली आहे. मात्र, त्यांचा क्रिकेटचा दुरान्वयेही संबंध आलेला नाही तसेच खेळपट्टी बनवण्याचा त्यांना काहीही अनुभव नाही. ते सध्या कापड क्षेत्रतील व्यापारी म्हणून कार्यरत आहेत. एका अत्यंत महत्त्वाच्या मालिकेसाठी रमेश यांना खेळपट्टी बनवण्याची जबाबदारी कशी काय दिली गेली अशी विचारणा केली असताना तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या एकाही सदस्याने त्यावर बोलण्यास तयारी दर्शवली नाही.
हौशी म्हणून अर्ज केला व काम मिळाले
तमिळनाडू क्रिकेट संघटना तसेच खुद्द रमेश कुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यावरही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अर्थात, संघटनेनेच या मैदानाची खेळपट्टी तयार करण्यास उत्सुक असलेल्यांकडून अर्ज मागवले होते, असे समोर आले आहे. त्यात अर्ज केल्यावर रमेशकुमार यांना काम मिळाले, अशी माहितीही बीसीसीआयच्या सदस्याने दिली आहे. एकूणच ही खेळपट्टी रामभरोसे असेल अशी भीती व्यक्त होत असून संघटनेने केलेल्या या प्रतापावर आता बीसीसीआय काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गोलंदाजीला पूरक असेल चेन्नईची खेळपट्टी
चेन्नईच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असेल. पण दुसऱ्या दिवसापासून ही खेळपट्टी फलंदाजांसह फिरकी गोलंदाजांनाही मदत करेल, असा दावा संघटनेने केला आहे. या मैदानावर दोन कसोटी सामने खेळण्यात येणार असून खेळपट्टी कशी असेल ते सामन्यापूर्वी सकाळी पाहणी केल्यावरच दोन्ही संघ आपला अंतिम संघ जाहीर करतील.