मेलबर्न :- एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेनंतर पुढील वर्षी लगेचच 2024 चा टी-20 विश्वकरंडक खेळवला जाणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेची तयारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेपासून सुरू करणार आहे. ही मालिका 23 नोव्हेंबरपासून भारतात खेळवली जाणार आहे.
दोन्ही संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ शनिवारी जाहीर केला आहे. या मालिकेत यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथने टी-20 संघात पुनरागमन केले आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ऍश्टन अगर दुखापतीमुळे या मालिकेचा भाग होऊ शकलेला नाही. ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऍश्टन अगरला दुखापत झाली होती. याशिवाय विश्वकरंडक खेळणाऱ्या काही खेळाडूंना या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. दुसरा सामना 26 नोव्हेंबरला त्रिवेंद्रममध्ये होणार आहे. तिसरा टी-20 सामना 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे खेळवला जाईल. यानंतर चौथा टी-20 सामना 1 डिसेंबरला नागपुरात तर मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबरला हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ : मॅथ्यू वेड (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन ऍबॉट, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, ऍडम झाम्पा, तन्वीर संघा.