बीड : कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. आता त्यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात एका प्रवचनाच्या कार्यक्रमात माध्यमांच्या कॅमेरांवर इंदुरीकर महाराज संतापलेले पाहायला मिळाले. कॅमेरे बंद केले नाहीत आणि प्रवचनानंतर काही बातम्या प्रकाशित झाल्या तर आयोजकांनी याची जबाबदारी घ्यावी असा संताप इंदुरीकर महाराजांनी भर व्यासपीठावरुन व्यक्त केला.
इंदुरीकर महाराजांची समजूत काढण्यासाठी मग कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आपले प्रवचन सुरू केले. ही सगळी घटना कॅमेरात कैद झाली आहे. . बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचा समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाने गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. त्यावेळी इंदुरीकर महाराज आणि प्रसारमाध्यमांचे कॅमेरे यांच्यात खटका उडाला.
यावेळी बोलताना महाराज यांनी, ‘कीर्तनातलं मधलं कुठलंतरी एक वाक्य उचलायचं आणि त्यानंतर कीर्तनातलं दुसरं कुठलंतरी वाक्य कापायचं, ते एकमेकाशी जोडून फेसबुक, युट्युबवर अपलोड करायचं, याचे परिणाम आम्हाला भोगायला लागतात’, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी संताप व्यक्त केला. फेसबुकवर, युट्युबवर टाकल्या जाणाऱ्या व्हिडीओवर त्यांनी आगपाखड करतानाच कॅमेरे बंद करा आणि खाली उतरा, असा इशारा त्यांनी दिली. जोपर्यंत कॅमेरामन खाली उतरत नाही, तोपर्यंत ते कॅमेरा ऑपरेट करणाऱ्यांना इशारा देतच राहिले होते.
तुम्ही जबाबदारी घेणार का व्हिडीओ अपलोड झाले तर, असे म्हणत इंदुरीकर महाराजांनी सवाल केला. त्यानंतर एक व्यक्ती इंदुरीकर महाराजांची समजूत काढण्यासाठी वर आली. पण तिचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. वर आलेल्या व्यक्तीनं मोबाईल काढून महाराजांना काहीतरी दाखवलं. त्यांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या. पण तरीही महाराज काही ऐकले नाही. अखेर धनंजय मुंडे यांना मध्ये पडावे लागले.
धनंजय मुंडे यांनी अखेर प्रसार माध्यमांचे कॅमेऱे त्यांना जे काम करायचं ते करतील, आपण अध्यात्माचं काम करावं, असे म्हटले आणि कीर्तन पुढे सुरु ठेवण्यास विनंती केली. धनंजय मुंडे यांनी केलेल्या विनंतीनंतर इंदुरकीर शांत झाले. परळीत घडलेला हा सगळा प्रकार चर्चेचा विषय ठरतोय. दरम्यान, समोर आलेल्या व्हिडीओ धनंजय मुंडे हे कुठेत दिसत नसले, तरी त्यांच्या आवाज व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानचा कार्यक्रम चर्चेत आहे. या कीर्तनादरम्यान, घडलेल्या या प्रकाराने इंदुरीकर महाराजांना कॅमेऱ्याची धास्ती का वाटतेय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.