गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
देवनदीचा विकास करण्याचा लोणावळा नगरपरिषदेचा मानस
लोणावळा – सध्या एकप्रकारे गटार गंगेचे स्वरूप प्राप्त झालेल्या देवनदी “इंद्रायणी’चा विकास गुजरात राज्यामधील साबरमती नदीच्या धर्तीवर करण्यासंदर्भात लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची अहमदाबाद येथे भेट घेऊन चर्चा केली.
लोणावळा शहरात उगम पावणारी इंद्रायणी नदी महाराष्ट्राच्या अध्यात्मिक क्षेत्रात पवित्र मानली गेली आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांची कारकीर्द ज्या आळंदी या आणि देहू गावात घडली ती दोन्ही गावं इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेली आहेत. याशिवाय इंद्रायणी नदी ज्या भीमा नदीला जाऊन मिळते, त्या भीमेच्या काठावरच पुढे श्रीक्षेत्र पंढरपूर वसलेले आहे. अशा या पवित्र नदीची लोणावळा शहरातील दुरवस्था बघितल्यास याच नदीला देवनदी म्हणून संबोधले जाते का? असा प्रश्न पडतो.
सोबतच स्वच्छतेच्या बाबत संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाच्या शर्यतीत असलेल्या लोणावळा शहराला इंद्रायणी नदीची दुरवस्था एक डोकेदुखी बनून राहिलेली आहे. यावर कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी आणि नदीचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली एका अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुजरात मधील अहमदाबाद शहरातून वाहणाऱ्या साबरमती नदीचा जो कायापालट तेथील प्रशासनाकडून करण्यात आला, तो कशाप्रकारे केला गेला याची सविस्तर माहिती या दौऱ्यात घेण्यात आली.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी साबरमती नदीचा विकास करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, तसेच आता विकास झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाला आणि राज्याला कशाप्रकारे फायदा झाला याची सविस्तर माहिती दिली. सोबतच स्टॅच्यु ऑफ युनिटी आणि त्या परिसरात पूर्ण झालेल्या तसेच निर्माणाधिन असलेल्या ग्लो गार्डन, प्राणी संग्रहालय, टेंट सिटी, लेजर शो आदींची माहिती त्यांनी स्वतः दिली.
यावेळी त्यांच्यासोबत अहमदाबाद महापालिकेच्या महापौर बिजल पटेल उपस्थित होत्या. तर लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक राजू बच्चे, देविदास कडू, दिलीप दामोदरे, सुधीर शिर्के, भरत हरपुडे, शिवदास पिल्ले, माणिक मराठे, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, संध्या खंडेलवाल, पूजा गायकवाड, सुवर्णा अकोलकर, गौरी मावकर, आरोही तळेगावकर, रचना सीनकर, मंदा सोनवणे आदींसह प्रमोद गायकवाड, अनिष गणात्रा, शैलजा फासे आदींसह लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.