‘प्रभात’च्या वर्धापन सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्याला मदत
कोणाताही गाजावाजा न करता खिशात ठेवले पाच हजार रुपये
पिंपरी – अनेक वेळा एखाद्या कार्यक्रमामध्ये गेल्यावर आपले पैसे गायब झाल्याच्या घटना घडतात. काही वेळेस मौल्यवान वस्तूंवरही चोर हात साफ करतात. मात्र आपण एखाद्या कार्यक्रमात गेलो आणि तिथे आपल्या खिशात नकळत कोणीतरी पैसे ठेवले तर. हे आपल्याला केवळ स्वप्न वाटत असले तरी हा योगायोग घडला आहे दैनिक “प्रभात’च्या पिंपरी चिंचवड कार्यालयाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये.
दैनिक “प्रभात’ वृत्तपत्राच्या वर्धापनदिनी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या खिशात अज्ञात व्यक्तीने पाच हजार रुपयांची रक्कम त्यांच्या कोटच्या खिशात ठेवली. दैनिक “प्रभात’ने आपल्या वर्धापन दिनानिमित्त “यशोगाथा’ हा विशेषांक प्रकाशित केला होता. या विशेषांकामध्ये निराधार आणि गरीब रुग्णांसाठी कार्यरत असलेल्या हुसैन यांच्याबद्दल माहिती प्रकाशित केली होती. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून कुणीतरी नकळतच त्यांच्या खिशात ही “मदत’ ठेवली.
बुधवारी प्रभातच्या पिंपरी चिंचवड कार्यालयाचा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात पार पडला. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहाच्या प्रांगणात आयोजित या सोहळ्यासाठी शहरातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक अशा सर्वच पाहुण्यांनी हजेरी लावली होती. गेल्या नऊ दशकांपासून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या “प्रभात’च्या वर्धापनदिनासाठी तुडूंब गर्दी झाली होती. प्रत्येकजण एकमेकांना नवीन वर्ष व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त होते. या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रिअल लाइफ रिअल पीपल संस्थेचे संस्थापक एम. ए. हुसैन हे ही उपस्थित होते. हुसैन वायसीएम रुग्णालयामध्ये बेवारस रुग्णांची सेवा करतात. त्यांची संस्था अशा रुग्णांना सांभाळण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असते.
स्नेहमेळाव्यासाठी एम. ए. हुसैन हे देखील आले होते. सर्वांना शुभेच्या देण्यात ते व्यस्त होते. यावेळी तिथे उपस्थित कित्येकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यानंतर रात्री साडे आठ वाजता ते त्यांच्या निवासस्थानी गेले. घरी गेल्यावर त्यांनी सहज खिशामध्ये हात घातला तर त्यांच्या हाताला पाच हजार रुपयांची रक्कम लागली. ते ही आश्चर्यचकित झाले. त्यांनी हे पैसे आपल्या घरच्या कोणी व्यक्तींनी खिशात ठेवले आहेत का याची चौकशी केली. मात्र घरातील कोणत्याही सदस्याने हे पैसे ठेवले नव्हते. तर वर्धापन दिनाच्या स्नेहमेळाव्यामध्ये संस्थेला मदत व्हावी या उद्देशांने कुठल्यातरी व्यक्तीने हे पैसे त्यांच्या खिशात ठेवल्याचे त्यांच्या लक्षात आले. एम. ए. हुसैन निराधार रुग्णांची सेवा करत असल्याने त्यांच्या संस्थेला सर्वच स्तरातून मदतीचा ओघ असतो. मात्र अशा पद्धतीने संस्थेला झालेली मदत त्यांनी प्रथमच अनुभवली.
मी प्रभातच्या वर्धापन दिनाच्या स्नेहमेळाव्यास उपस्थित होतो. त्यावेळी अनेक राजकीय, प्रशासकीय व्यक्ती व वाचकांशी भेटणे झाले. त्यावेळी कुणीतरी ते पाच हजार रुपये माझ्या खिशात ठेवले. त्या ठिकाणी मला याची कल्पना आली नाही. मात्र घरी गेल्यावर ही बाब माझ्या लक्षात आली. ज्या व्यक्तीने संस्थेच्या मदतीसाठी हे पैसे माझ्या खिशात ठेवले त्यांचे मन:पूवर्क आभार.
– एम. ए. हुसैन, सामाजिक कार्यकर्ते