नवी दिल्ली – सिक्कीमजवळ नकु-ला पासजवळ आज भारतीय जवान आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. दोन्ही सैनिकांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीमध्ये काही सैनिक जखमीही झाले. मात्र स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी चर्चेद्वारे हा संघर्ष मिटवला. त्यामुळे या संघर्षाचे पर्यावसन अधिक तीव्र संघर्षात झाले नाही.
यापूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये लडाखमधील पांनगोंग लेक जवळ दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारीचा प्रसंग उद्भवला होता. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये अशाप्रकारे तणाव निर्माण झाला नव्हता. मात्र आज निर्माण झालेल्या संघर्षाच्या वातावरणामुळे दोन्ही देशांमधील सीमाभागात अतिरिक्त तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
परस्पर सामंजस्यातून आणि योग्य त्या संवादाच्या आदान प्रदानातून अशाप्रकारचे तंटे सोडवले जात असतात. तशाच प्रकारे आजचाही तंटा सोडवला गेला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.