बॉलीवूडमधील “धकधक गर्ल’ अर्थात मराठमोळी माधुरी दीक्षित आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहे. येत्या 15 मे रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्या माधुरी दीक्षितने नुकताच एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.
अगदी लहान वयात “अबोध’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या माधुरीला लोकप्रियता मिळाली ती “तेजाब’ या चित्रपटाने. यातील “एक दो तीन’ हे गाणे खुपच गाजले होते. त्यानंतर यशाने तिची पाठ सोडली नाही.अशा या “धकधक गर्ल’ने नुकताच आपल्या बहिणीसोबतच एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला. माधुरीची बहीण रुपा हीदेखील तिच्याइतकीच सुंदर आहे आणि नृत्यनिपुण देखील आहे. माधुरीच्या करियर मागे तिचा मोठा हात आहे. घरातले शेंडेफळ असलेल्या माधुरीला तिच्या दोन्ही बहिणी म्हणजे रुपा आणि भारती यांचा प्रचंड पाठिंबा होता.
या फोटोत ती आणि तिची बहिणी डान्स करताना दिसत आहेत. हा फोटो माधुरीच्या लहानपणीचा आहे. विशेष म्हणजे माधुरीची बहीण हुबेहूब तिच्यासारखी दिसत असून त्यांची हेअर स्टाइलदेखील सारखीच असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘माझ्या बहिणीसोबत अनेक आठवणी आहेत. मात्र, ही सगळ्यात आवडती आठवण आहे. आम्ही शाळेतील प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचो. माझ्या सगळ्यात आवडत्या सोबतीसह मी हा फोटो शेअर करत आहे. तुमच्या लहानपणातील तुम्हाला लक्षात राहिलेली, आवडती आठवण कोणती? सांगू शकता का?’, असे कॅप्शन माधुरीने या फोटोला दिले आहे.