“दौंड शुगर’ देणार 2800 रुपये प्रति मेट्रिक टन

संचालक वीरधवल जगदाळे यांची 2018-19 च्या गळिताबाबत माहिती

देऊळगावराजे  – आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर कारखान्याच्या 2018-19 च्या गळीत हंगामातील झालेल्या उसास अंतिम दर रुपये 2800 प्रति मेट्रिक टनाप्रमाणे जाहीर करण्यात येत असल्याची माहीती दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी कार्यक्रमावेळी दिली.

यावेळी कारखान्याचे संचालक शहाजी गायकवाड यांनी सध्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादनात घट होणार असल्याने उसाची सर्वच कारखान्यांना टंचाई जाणवणार आहे. याकरिता सर्व शेतकरी बंधूंनी आपला जास्तीत जास्त ऊस दौंड शुगरकडे गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, तसेच कारखान्यामार्फत ऊस उत्पादन वाढीसाठी विविध योजना राबण्यात येतात, त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.

या हंगामामध्ये कारखान्याने 9 लाख 61 हजार 970 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 10 लाख 86 हजार 450 क्किटल साखर पोती उत्पादित केलेली आहेत. या हंगामातील कारखान्याची शेतकऱ्यांना देय एफआरपी रक्कम रुपये 2692.83 प्रति मेट्रिक टन प्रमाणे होती. तथापि कारखान्याने रुपये 2693.83 प्रति मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. याच अनुषंगाने एफआरपीपेक्षा जादा रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी रुपये 107 प्रति मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम बॅंक खात्यावर दिवाळीपूर्वी वर्ग करण्यात येईल. हा अंतिम दर रुपये 2800 प्रति मेट्रिक टन हा दौंड तालुक्‍यातील इतर कारखान्यापेक्षा जास्त देण्यात येत असल्याचे वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.

 

कारखान्याचे शहाजी गायकवाड यांनी चालू गळीत हंगामासाठी तयारी पूर्ण झाली असून उस तोडणी वाहतूक कामाकरिता 465 वाहनटोळी, 350 बैल टायरगाडी, 250 ट्रॅक्‍टर टायर गाडी, मजूरांचे करार केलेले असून, मशिनरीची कामे पुर्णत्वास येत असून, जास्तीत जास्त ऊस गाळपाचे नियोजन करण्यात येत आहे.

– शहाजी गायकवाड, संचालक, दौंड शुगर 

Leave A Reply

Your email address will not be published.