भारताच्या शस्त्र इतिहासाचा अभ्यास गरजेचा- गिरीजा दुधाट

पुणे : शस्त्र हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग राहिला आहे. शस्त्रांचा अभ्यास म्हणजे केवळ युध्दाचा अभ्यास नव्हे तर आपला इतिहास, संस्कृती आणि परंपरेचाही अभ्यास त्यामध्ये होतो, परंतु आतापर्यत शस्त्रांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास झालेला नाही. भारताच्या शस्त्र इतिहासाचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत इतिहास संशोधक गिरीजा दुधाट यांनी व्यक्त केले.

इतिहास संस्कृती कट्टा या संस्थेतर्फे गिरिजा दुधाट यांचे मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संदीप परांजपे, तन्मय पेंडसे, गिरीश मांडके, डॉ. सचिन जोशी, शिवराम कार्लेकर उपस्थित होते.

भारतामध्ये शस्त्रांचा मोठया प्रमाणावर वापर हा १२ व्या ते १८ व्या शतकाच्या दरम्यान झाला. हा काळ सर्वाधिक  अस्थिरतेचा आणि युध्दाचा होता, त्यामुळे शस्त्रांचाही वापर अधिक झाला. शस्त्र हा केवळ भारताच्या युध्दनितीचा आणि सामा्रज्यशाहीचा इतिहास नाही तर आपल्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, त्यासाठी त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे, असेही गिरिजा दुधाट यांनी यावेळी सांगितले.

गिरीजा दुधाट म्हणाल्या, मानवी संस्कृती उदयाला आल्यापासून माणूस शस्त्रांचा विविध कारणांसाठी वापर करीत आहे. भारतामध्ये शस्त्रांचा इतिहास हा साडे तीन ते चार लाख वर्षे जुना आहे. सुरुवातीला माणूस दगडांचा शस्त्र म्हणून वापर करित असे यामध्ये प्रामुख्याने माणसे जंगली जनावरांपासून संरक्षण आणि अन्नासाठी शस्त्रांचा वापर करित होता. यानंतर जसे माणसाच्या बुध्दीमध्ये आणि शरीर रचनेमध्ये बदल झाला, त्याप्रमाणे माणसाची शस्त्रे आणि ती शस्त्रे वापरण्याच्या पध्दतीही बदलल्या असे त्या म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.