नवी दिल्ली – भारतीय महिलांनी मॉंटेनेग्रो येथे झालेल्या निमंत्रित आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत पाच सुवर्ण पदकांची कमाई केली. बेबीरोजीसाना चानू (51 किलो) आणि अरुंधती चौधरी (69 किलो) यांनी सुवर्णपदकाची कमाई केली.
या स्पर्धेत भारतीय महिला पदकतालिकेत पहिल्या स्थानावर राहिल्या. लकी राणा (64 किलो) हिला रजतपदकावर समाधान मानावे लागले. पदकतालिकेत आघाडीचे स्थान पटकाविणाऱ्या भारताने पाच सुवर्ण, तीन रजत तर, दोन ब्रॉंझ अशी एकूण 10 पदके मिळविली. उझबेकिस्तान आणि चेक प्रजासत्ताक अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले.
खेलो इंडियात तीन वेळा सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली अरुंधती हिने आपल्या तुफानी खेळाने निर्विवाद वर्चस्व राखताना युक्रेनच्या मर्याना स्टोईको हिचा 5-0 असा पराभव केला. मेरी कोमच्या अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या चानू हिने आशियाई कुमार विजेती उझबेकिस्तानची सबिना बोबोकुलोवा हिचा प्रतिकार मोडून काढताना 3-2 असा विजय मिळविला. लकी राणा हिला सुवर्णपदकाच्या लढतीत 0-5 असा पराभव पत्करावा लागला.
पुरुष गटात भारताच्या 19 सदस्यीय पथकाला 12 पदकासह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला मुष्टियोद्धा म्हणून भारताच्याच विंका हिची निवड करण्यात आली. तिने 60 किलो वजनी गटात सुवर्ण कामगिरी केली.