जेरुसलेम – इस्रायलमध्ये हमासकडून रॉकेटचा मारा केला जात असताना निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणात इस्रायल-गाझामध्ये असलेले भारतीय विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे.
तेल अविवमधील भारतीय दूतावासाकडे स्थानिक भारतीय रहिवासी, विद्यार्थी आणि पर्यटकांनीही सुरक्षितपणे बाहेर काढले जाण्यासाठीच्या सुविधांची मागणी केली आहे.
इस्रायल आणि गाझा पट्ट्यामध्ये सुमारे 18 हजार नागरिक आहेत. आतापर्यंत या भारतचीय नागरिकांबाबत कोणतीही अप्रिय घटना समजलेली नाही, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
इस्रायलमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या काही पर्यटकांनी भारतीय दूतावासाकडे मदतीची मागणी केली आहे. संघर्ष वाढल्यामुले इस्रायलमध्ये व्यवसायिक कारणाने गेलेले काही व्यवसायिक देखील अडकून पडले आहेत.
तेल अविवमधील भारतीय दूतावास आणि पॅलेस्टाईनमधील प्रतिनिधी कार्यालयाने शनिवारी भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. सावध रहावे आणि कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी दूतावासाच्या संपर्कात रहावे, असे या मार्गदर्शक सूचनेमध्ये म्हटले आहे.
इस्रायलमध्ये व्यवसायिकांव्यतिरिक्त विद्यार्थी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि हिऱ्यांच्या उद्योगाशी संबंधित व्यापारी सुमारे हजार जण देखील आहेत. विद्याथ्याना एकमेकांच्या संपर्कात राहण्यास शिक्षण संस्थांच्यावतीने सांगम्यात आले आहे.
काल रॉकेट हल्ला सुरू झाल्यावर अनेक विद्यार्थी भूमिगत बंकरमध्ये आश्रयासाठी गेले होते. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात येत असून अफवा पसरवू नयेत, असे या विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे.