FBI Reward On Indian Missing Student: अमेरिकेची गुप्तचर आणि सुरक्षा एजन्सी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने न्यू जर्सीमधून हरवलेल्या भारतीय विद्यार्थीनीबद्दल माहिती देणाऱ्यास यूएस $ 10,000 चे बक्षीस जाहीर केले आहे. गेल्या वर्षी एफबीआयने भारतीय विद्यार्थिनी मयुशी भगत हिचा ‘मिसिंग पर्सन’ यादीत समावेश केला होता.
रंगीबेरंगी पँट आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट घालून 29 एप्रिल 2019 रोजी जर्सी सिटीतील तिच्या अपार्टमेंटमधून बाहेर पडताना मयुशी भगतला अखेरचे पाहिले होते. तिच्या कुटुंबीयांनी 1 मे 2019 रोजी ती बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. अशा परिस्थितीत गेल्या 4 वर्षांपासून अमेरिकन पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र आता एफबीआय बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्यीनीची माहिती देणाऱ्याला 10 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच साडेआठ लाख रुपये बक्षीस देणार आहे.
स्टुडंट व्हिसावर अमेरिकेला गेली होती मयुशी –
FBI नेवार्क फील्ड ऑफिस आणि जर्सी शहर पोलीस विभागाने मयुशीच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकलण्यासाठी जनतेची मदत मागितली आहे. जुलै 1994 मध्ये भारतात जन्मलेली मयुशी भगत स्टुडंट व्हिसावर अमेरिकेला गेली होती आणि न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकत होती. एफबीआयच्या निवेदनानुसार ती इंग्रजी, हिंदी आणि उर्दू बोलते आणि न्यू जर्सीच्या साउथ प्लेनफिल्डमध्ये तिचे मित्र आहेत असा पोलिसांना विश्वास आहे.
मयुशी कशी दिसते?
गुप्तचर संस्थेने म्हटले आहे की, ज्या कोणाला मयुशी, तीच्या ठावठिकाणा किंवा ती बेपत्ता झाल्याबद्दल माहिती असेल त्याने एफबीआय नेवार्क किंवा जर्सी शहर पोलीस विभागाला कॉल करावा. मयुशी भगतची उंची 5 फूट 10 इंच आहे. मध्यम शरीरयष्टी असलेल्या या मुलीचे डोळे तपकिरी, काळे केस असल्याचे सांगितले जाते. 2016 मध्ये ती F1 स्टुडंट व्हिसावर अमेरिकेत आली होती. एफबीआयने आपल्या वेबसाइटच्या “मोस्ट वॉन्टेड” पृष्ठावर भारतीय विद्यार्थ्यीनीचे ‘मिसिंग पर्सन’ पोस्टर प्रदर्शित केले आहे, तिला “अपहरण/मिसिंग पर्सन” म्हणून सूचीबद्ध केले आहे.