ध्यास भारतीय नृत्य-संगीताचा

– दीपेश सुराणा

निगडी-प्राधिकरण येथील राजश्री हिने वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच आई आणि नृत्य गुरू वैशाली पळसुले-धोंगडे यांच्याकडे कथ्थक नृत्याचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. सहाव्या वर्षी चिंचवडगाव येथील घारेशास्त्री सभागृहात तिचा नृत्याचा पहिला कार्यक्रम झाला. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2017 मध्ये ती विशेष प्राविण्यासह नृत्य विशारद झाली. 2019 मध्ये विशेष प्राविण्यासह नृत्य अलंकार ही पदवी मिळविली. नृत्याचे पुढील उच्च शिक्षण ती सध्या गुरू पंडित राजेंद्र गंगाणी यांच्याकडे घेत आहे.

नृत्य क्षेत्रात सातत्य ठेवत तिने नृत्याचे विविध कार्यक्रम केले आहेत. 2013 मध्ये बॅंकॉक, 2014 मध्ये सिंगापूर तर 2016 मध्ये युरोपमधील वेगवेगळ्या देशात (जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स, नेदरलॅंड आदी) नृत्य सादरीकरण केले. युरोपमधील वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन तिने नृत्याबाबत मार्गदर्शन देखील केले आहे. हा अनुभव खूपच वेगळा आणि छान होता. तेथे नृत्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला, असे राजश्री आवर्जून नमूद करते.

शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा, संगीतकार शंकर महादेवन, प्यारेलाल, पंडित हृदयनाथ मंगेशकर आदी दिग्गजांसमोर तिला नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. नेहरू युवा केंद्राच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नृत्य स्पर्धेत सलग तीन वर्ष कथ्थक नृत्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तिने पटकावले. तिने “दम दमा दम..’ या दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात सहभाग घेतला. गोवा येथील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (2017), महापालिकेचा स्वरसागर महोत्सव (2018), आशा भोसले पुरस्कार सोहळा, मधुरिता सारंग संगीत महोत्सव (2019) आदी कार्यक्रमांमध्ये नृत्याचे सादरीकरण केले.

2018 मध्ये तिला “कलारंग’ पुरस्काराने गौरविण्यात आले. संचय कथ्थक नृत्य ऍकॅडमीला 28 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ऍकॅडमीतर्फे नृत्याचे 28 कार्यक्रम करण्याचे नियोजन तिने केले आहे. जूनपासूनच हे कार्यक्रम सुरू आहेत. नृत्यामध्ये आणखी खूप पल्ला गाठायचा आहे. याच क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजश्रीने सांगितले.

 

राजश्री धोंगडे
युवा नृत्यांगना राजश्री धोंगडे हिने कथक नृत्य क्षेत्रामध्ये अल्पावधीतच स्वत:चे वेगळे अस्तित्त्व निर्माण केले आहे. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी नृत्य विशारद, नृत्य अलंकार झालेल्या राजश्रीने देश-विदेशात नृत्याचे कार्यक्रम करून स्वत:ला सिद्ध केले आहे.

नृत्याबरोबरच तबला, संवादिनी वादन आणि नारदीय कीर्तन ती सादर करते. नृत्याचा नियमित रियाज करणे गरजेचे आहे. तुम्ही जितका रियाज कराल, तितके तुमचे नृत्य सुधारते, असे राजश्री ठामपणे सांगते.

Leave A Reply

Your email address will not be published.