निवडणुकीत “पाणीप्रश्‍न’ गाजणार

समस्या तीव्र : सात वर्षांत नवे 27 हजार नळजोड

पिंपरी – पिंपरी – चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. मात्र, गेल्या सात वर्षांत शहराची लोकसंख्या तब्बल साडेनऊ लाखाने वाढली असून 27 हजार 319 नवीन ग्राहकांनी अधिकृत नळजोड घेतले आहेत. झोपडपट्टयांमधील नळजोडांची मोजदाद नाही. एकीकडे पाण्याची मागणी वाढत असताना दुसरीकडे पाणी पुरवठा तेवढाच असल्याने पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पाणी प्रश्‍न गाजण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेसाठी पवना धरणातून 6.55 टीएमसी इतके पाणी आरक्षित आहे. पवना नदीतून पाणी बंद पाईपलाईनद्वारे निगडी – सेक्‍टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते. येथील चार जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाण्यावर प्रक्रिया करुन विविध टाक्‍यांमधून बंद जलवाहिन्यांद्वारे पुरविले जाते. पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी चार टप्प्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सन 2011 च्या जनगणनेनुसार 17 लाख 30 हजार लोकसंख्येला शहराचा पाण्याचा मापदंड 135 लिटर प्रति माणसी प्रति दिन याप्रमाणे ठरविण्यात आला. मात्र, शहराची लोकसंख्या सध्या 20 लाखाच्या पुढे पोहचली आहे. सध्या शहरात प्रति व्यक्‍ती प्रति दिवस 150 लिटर पाण्याची गरज भासते. पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ठिकठिकाणी 27 पंप हाऊस केंद्र आहेत. जमिनीअंतर्गत 17 पाण्याच्या टाक्‍या आहेत. तर उंचावरील पाण्याच्या टाक्‍या 85 आहेत. फेब्रुवारी 2018 पासून 18 पंप ओव्हरलोडिंगसह 24 तास चालू आहेत.

सध्या शहराची लोकसंख्या 22 लाखांच्या घरात आहे. पिंपरी – चिंचवड शहरात नळजोडणी केलेल्या घरगुती ग्राहकांची संख्या सुमारे 1 लाख 36 हजार एवढी आहे. त्यामध्ये साडेचार हजार व्यावसायिक ग्राहक असून सार्वजनिक क्षेत्रातील 92 ग्राहक आहेत. त्यापैकी 1 लाख 30 हजार घरगुती ग्राहकांनी पाणीमीटर जोडले आहेत. तर झोपडपट्टी क्षेत्रात सुमारे सात हजार ग्राहक आहेत. झोपडपट्टीतील एकाही नागरिकाने पाणीमीटर घेतलेला नाही.

लोकसंख्या वाढलेली असताना सध्या सरासरी 508 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत स्वरूपात होत आहे. 19 ऑगस्टपासून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तरी देखील पुरेसा पाणीपुरवठा करण्यास महापालिकेला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्ष ऐन निवडणुकीत पाणी समस्येवरुन सत्ताधाऱ्यांना घेरु शकतात. शहरातील बहुसंख्य सोसायट्यांनी “नो वॉटर, नो व्होट’चा इशारा दिल्याने उमेदवार येथील मतदारांचा सामना कसा करणार, याबाबत उत्सुकता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)