माऊलींचा संजीवन समाधी सोहळा 25 नोव्हेंबरला

प्रमुख विश्‍वस्त ढगे-पाटील यांची माहिती : यंदा दोन एकादशी आल्याने होता संभ्रम

आळंदी  – राज्यभरातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यादरम्यान यंदा दोन एकादशी आल्याने वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार त्रयोदशीचा संजीवन समाधी सोहळा दि. 24 नोव्हेंबरऐवजी दि. 25 नोव्हेंबरला साजरा होणार असल्याचे संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे-पाटील यांनी सांगितले.

आळंदीत कार्तिक वारी आणि दिवाळीचे नियोजन सुरू आहे. त्यासंदर्भात शनिवारी (दि. 5) देवसंस्थानाच्या नगारा घरात सर्व वारकरी बांधवांना चालक-मालक चोपदार दिंडेकरी आदींची संयुक्‍तीक बैठक बोलली होती, त्यावेळी वरील निर्णय घेण्यात आला. आळंदी देवाची (ता. खेड) येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी वारी अवघ्या दीड ते दोन महिन्यांवर आली असून, राज्यभरातील भाविक दिंड्यांच्या माध्यमातून श्रीक्षेत्र आळंदीच्या दिशेने वाटचाल करीत असतात.

दरम्यान, यंदा सर्वच दिनदर्शिकांमध्ये संजीवनी समाधी सोहळा दि. 24 नोव्हेंबर रोजी दाखविण्यात आला आहे. यंदा कार्तिकी कृष्ण पक्षात स्मार्त एकादशी व भागवत एकादशी आशा दोन एकादशी आल्याने द्वादशी व त्रयोदशी कधी साजरी करायची याबाबत संभ्रम निर्माण झाला होता;मात्र वारकरी संप्रदायात भागवत एकादशीला महत्त्व असल्याने त्यानुसार बैठक घेण्यात आली व याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात येणार
आहे.

असा असेल सोहळा
वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार कार्तिक कृष्ण अष्टमीला दि. 20 नोव्हेंबर रोजी वै. गुरुवर्य हैबत बाबा पायरी पूजनाने संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. दि. 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी होणार असून दि. 24 नोव्हेंबरला द्वादशीला खिरापतीचे अभंग व मानकऱ्यांना नारळ प्रसाद व खिरापत वाटप होणार आहे. दि. 25 नोव्हेंबर रोजी त्रयोदशीचा मुख्य संजीवन समाधी सोहळा साजरा होणार आहे.

तिथीक्षय झाल्याने निर्माण झाला होता प्रश्‍न
यंदा तिथीक्षय झाल्याने हा प्रश्‍न उपस्थित झाला असून भागवत एकादशीनुसार त्रयोदशी दि. 25 नोव्हेंबरला येत आहे त्यामुळेच सोहळ्याच्या नियोजनाबाबत बैठक आयोजित केली आहे. राज्यभरातील भाविकांना याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून प्रसारमाध्यमाद्वारे सूचित करण्यात आले असल्याचे आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे-पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.