बार्बाडोस :- वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या महिलांच्या कॅरिबेयन प्रीमिअर लीग स्पर्धेत भारताच्या श्रेयांका पाटीलने आपल्या चमकदार कामगिरीत सातत्य राखले आहे. तीने ऍमेझॉन वॉरिअर्सकडून खेळताना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर वर्चस्व राखले.
या स्पर्धेला 31 ऑगस्टपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण 3 संघांमध्ये 6 सामने पार पडणार आहेत. या स्पर्धेत भारताची स्टार महिला क्रिकेटपटू व फिरकी गोलंदाज श्रेयांका पाटीलने आपल्या कामगिरीचा दबदबा निर्माण केला आहे. श्रेयांका या स्पर्धेत खेळणारी पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. श्रेयांका या स्पर्धेत गयाना ऍमेझॉन वॉरियर्स संघाकडून खेळत आहे.
या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात गयाना ऍमेझॉन वॉरियर्सने त्रिनबागो नाईट रायडर्सवर 21 धावांनी विजय मिळवला. त्यात श्रेयांकाने 4 षटकांत 15 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केले.
श्रेयांकाने या स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत 3 सामन्यात सर्वाधिक 6 बळी मिळवले आहेत. श्रेयांकाला पहिल्या सामन्यात बार्बाडोस रॉयल्स विरुद्ध एकही बळी मिळाला नव्हता. मात्र त्यानंतर तीने दुसऱ्या सामन्यात बार्बाडोस रॉयल्स विरुद्धच 4 बळी घेतले.