बार्बाडोस :- भारताची युवा क्रिकेटपटू व ऑफ स्पीन गोलंदाज श्रेयांका पाटील हीने कॅरेबियन लीगमध्ये पदार्पण करताना अनोख्या कामगिरीला गवसणी घातली आहे. तीने अद्याप भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नसून थेट एखाद्या परदेशी लीगमध्ये पदार्पण करणारी श्रेयांका देशाची पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
श्रेयांकाने महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये गोलंदाजीच्या जोरावर चमकदार कामगिरी केली. श्रेयांकाने गयाना अमेझॉन वॉरियर्सकडून खेळताना बार्बाडोस रॉयल्सविरुद्ध विक्रमी कामगिरी केली. श्रेयांकाने 4 षटकात 34 धावा देत 4 गडी बाद केले.
बार्बाडोसच्या प्रमुख फलंदाज कर्णधार हेली मॅथ्यूज, रशादा विलियम्स, आलिया आणि चेडियन नेशन यांना तीने बाद केले. त्याचबरोबर महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये एकाच डावात 4 बळी घेणारी ती पहिलीच गोलंदाज ठरली आहे.
भारतातील महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमात श्रेयांकाने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना 6 सामन्यात 6 बळी मिळवले होते. मात्र, कॅरेबियन लीगमधील तीची कामगिरी व्यर्थ ठरली.
बार्बाडोस रॉयल्सने हा सामना 3 गडी राखून जिंकला. अमेझॉन वॉरिअर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 146 धावा केल्या होत्या. बार्बाबाडोस संघाने हे आव्हान 3 गडी राखून पूर्ण करत विजय मिळवला.