भारत शेजारधर्म पाळणार; ‘या’ 6 देशांना करणार लसीचा पुरवठा

मालदिव, भुतानला पहिली खेप रवाना

नवी दिल्ली – भारताने शेजारधर्म पाळत शेजारील देशांना करोना लसींचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. भूतान आणि मालदीवला करोना लसींची पहिली खेप सुद्धा भारताकडून पाठवण्यात आली असल्याची बातमी आहे. एअर इंडियाच्या विमानातून ऑक्‍सफर्ड-ऍस्ट्राजेनेकाच्या करोना लसीचे एक लाख डोस मालदीव येथे पोहोचले आहेत. तर भूतानसाठी कोव्हिशिल्ड लसींचे दीड लाख डोसेस पाठवण्यात आले आहेत. भारत सरकारच्या या निर्णयाचे मालदीवचे माजी पंतप्रधान मोहम्मद नशीद यांनी कौतुक केले आहे.

मोहम्मद नशीद यांनी ट्विट करुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे आभार मानले आहेत. भारत सरकारने करोना लसींचे एक लाख डोस पाठवले आहेत. भयानक अशा विषाणूपासून मुक्त होण्याच्या दिशेने मालदीवची ही एक सुरुवात आहे. आपला विश्वासू मित्र असलेल्या भारताने लष्करी उठाव, त्सुनामी, जलसंकट आणि करोना विषाणूच्या संकटात सर्वप्रथम मदत केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

तर, भारताने शेजारील आणि सहकारी देशांना कोविड- लसींचा पुरवठा सुरू केला आहे. भूतानसाठी आणि मालदीवसाठीही करोना लसीची खेप निघाली असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नमूद केले आहे.
मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं की, भारत आपल्या शेजारील भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स यांना कोविड- लसींचा पुरवठा करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, जागतिक समुदायाच्या आरोग्याच्या गरजा भागविण्यासाठी भारत विश्वासू सहकारी म्हणून मदत करत असल्याचा अभिमान वाटत आहे. बुधवारपासून लसींचा पुरवठा सुरू होईल आणि येत्या काही काळात आणखी लसींचा पुरवठा केला जाईल. सर्वात मोठ्या लस उत्पादक देशांपैकी भारत एक महत्वाचा देश आहे. करोना लस खरेदी करण्यासाठी भारतासोबत अनेक देशांनी संपर्क साधला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.