ग्रामपंचायत निवडणूक वार्तापत्र : विधानसभा निवडणुकीत “जायंट किलर’ ठरलेल्या आ. महेश शिंदे यांची गाडी सुसाट

पुसेगाव (प्रकाश राजेघाटगे/प्रतिनिधी) – एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत “जायंट किलर’ ठरलेले कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची गाडी ग्रामपंचायत निवडणुकीतही सुसाट सुटल्याचे निकालावरून दिसत आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सातारा-पंढरपूर रोडच्या उत्तर-दक्षिणेस तीन तालुक्‍यांमध्ये विस्तारला गेला आहे.

या पट्ट्यात राष्ट्रवादी ताकद जास्त आहे, म्हणून तर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ऐन वेळी उमेदवारी देऊनही, मतदारसंघात नवीन असलेल्या शशिकांत शिंदे यांनी डॉ. शालिनीताई पाटील यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या.

या संघटनशक्तीच्या जोरावर शशिकांत शिंदे हे गेल्या दहा वर्षांत विधानसभेचा गड आरामात सर करत होते; पण गेल्या चार-पाच वर्षात महेश शिंदे यांनी त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी कोरेगाव व खटाव तालुक्‍यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या होत्या.

त्यावेळीच ते शशिकांत शिंदे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करतील, असे वाटत होते आणि झालेली तसेच. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे हे विधानपरिषदेवर निवडून गेल्याने कोरेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीला बळ मिळेल, असे वाटत होते; परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत आ. महेश शिंदे यांनी बाजी मारली आहे.

सातारा तालुक्‍यातील वाढे, कोडोली, वनगळ, संगम माहुली, तासगाव, चिंचणेर वंदन, समर्थनगर या विधानसभा मतदारसंघातील मोठ्या गावांमध्ये आ. महेश शिंदे यांनी सत्तांतर घडवून आणले, तर वर्णे, महागाव, शिवथर या मोठ्या गावांमध्ये आ. शशिकांत शिंदे यांनी आपला गड राखला आहे; पण आ. महेश शिंदे यांना सातारा तालुक्‍यात मिळालेले यश आश्वासक आहे.

कोरेगाव तालुक्‍यात आ. महेश शिंदे यांनी घवघवीत यश मिळवले आहे. पेठ किन्हई, बोरजाईवाडी, भाकरवाडी, तांदुळवाडी, अंबवडे सं वाघोली, मंगळापूर,कठापूर, गोगावलेवाडी, गोडसेवाडी, अरबवाडी ही गावे महेश शिंदे यांच्या ताब्यात गेली आहेत.

आ. शशिकांत शिंदे यांचे होम पिच असलेल्या ल्हासुर्णेतील लढत लक्षवेधी होती. रमेश उबाळे यांनी काही दिवसांपूर्वी महेश शिंदे यांची साथ सोडताना केलेली पत्रकबाजी पाहता, महेश शिंदे गटाला या विजयाने नैतिकता मिळवून दिली आहे. सातारारोड, पाडळी व देऊर या मोठ्या गावांत मिळालेले यश आनंददायक आहे.

शशिकांत शिंदे गटाला दुघी, त्रिपुटी, भोसे, भंडारमाची, शेंदुरजणे, निगडी व बिचुकले या ठिकाणी यश मिळाले आहे. सातारा व कोरेगावच्या तुलनेत खटाव तालुक्‍यात राष्ट्रवादीने बऱ्यापैकी यश मिळवले आहे. विसापूर, वेटणे, मोळ, खातगुण, धारपुडी, गादेवाडी, रणसिंगवाडी येथे शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला, तर नेर, निढळ, जांब. जाखाणगांव व दरूज या ग्रामपंचायती महेश शिंदे गटाला मिळाल्या.

मागच्या वेळी महेश शिंदे यांच्या ताब्यात असलेले पुसेगाव ग्रामपंचायत यंदा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षात गावकी-भावकीच्या राजकारणाचा पाया असलेली ग्रामपंचायत निवडणूक यावेळी पक्षीय पातळीवर लढवली गेली. हे पाहता येणाऱ्या सर्व निवडणुका पक्षीय पातळीवर लढवल्या जाऊ शकतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.