हरियाणा – चीनमध्ये सध्या ‘कोरोना’ व्हायरसने अक्षरशः थैमान घातलं असून चीनमधील हजारो नागरिक या जीवघेण्या व्हायरसच्या प्रादुर्भावाने मृत्यूशी झुंज देत आहेत. चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून इतर देशांतून चीनमध्ये आलेले विद्यार्थी व नौकरदार सध्या आपल्या मायदेशामध्ये परतण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.
अशातच भारताने काल चीनमधील आपले ३२४ विद्यार्थी व नौकरदार एका विशेष विमानाने मायदेशी परत आणले असून त्यांना सध्या हरियाणातील मेंसर येथे उभारण्यात आलेल्या विलकता कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे. भारतामध्ये परतण्यापूर्वी चीनमध्ये वास्तव्यास असलेल्या या विद्यार्थ्यांनी कोरोना व्हायरसची दाहकता अनुभवलेली आहे. आपल्या मायदेशी परतल्याने या विद्यार्थ्यांमध्ये मृत्यूच्या दाढेतून सुटका झाल्याची भावना असून त्यांनी आपला आनंद विलकता कक्षामध्ये नृत्य करून साजरा केला आहे.
विलकता गृहातील याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत असून यामध्ये चीनमधून सुखरूप मायदेशी परतलेले विद्यार्थी तोंडावर मास्क बांधून मोठ्या आनंदाने नृत्य करताना दिसत आहेत. चीनमधून परतलेल्या विद्यार्थी व नौकरदारांपासून भारतामध्ये ‘कोरोना’ व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी शासनातर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून भारतीय सैन्याने या नागरिकांना ठेवण्यासाठी हरियाणातील मेंसर येथे विलकता कक्षाची उभारणी केली आहे.
Guess???? pic.twitter.com/w2ZA47s1lX
— Dhananjay kumar (@dhananjaypro) February 2, 2020