नवी दिल्ली – दूध उत्पादनामध्ये भारत देश जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकाचा देश ठरला आहे. जागतिक दूध उत्पादनाच्या एकूण उत्पादनात भारताचा तब्बल 24 टक्के वाटा आहे, अशी माहिती केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिली.
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना पुरुषोत्तम रुपाला म्हणाले, अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेसने दिलेल्या आकडेवारीनुसार 2021-22 या वर्षात जागतिक दूध उत्पादनात 24 टक्के योगदान देणारा भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश आहे.
भारताला दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमाकांचा बहूमान मिळालेला आहे. देशात राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांकडे सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य म्हणून पाहिले जाते. यामध्ये सुद्धा उत्तर प्रदेश प्रथम, तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. याबाबतची माहिती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून याआधी देण्यात आली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या क्रमांकावर आंध्र प्रदेश राज्याचा दूध उत्पादन करण्यात क्रमांक लागतो.
गेल्या आठ वर्षात म्हणजेच वर्ष 2014-15 ते वर्ष 2021-22 या कालावधीत भारतातील दूध उत्पादनात 51 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक पातळीवर भारताने दूध उत्पादनामध्ये 24 टक्के योगदान दिले आहे. देशातील दूध उत्पादन 2014-15मध्ये 146.31 दशलक्ष टनांवरून 221.1पर्यंत वाढले असल्याचे पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले.