दुबई – भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानचा यष्टिरक्षक महंमद रिझवान यांनी आयसीसीकडून दिला जाणारा “प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जिंकला आहे. इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेत केलेल्या संस्मरणीमय कामगिरीबद्दल हरमनप्रीतला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
A round of applause for @ImHarmanpreet on being named as ICC Women’s Player of the month for September 👏👏
Check out what the #TeamIndia captain said after winning the award 🏆👌 pic.twitter.com/I5OmKxvGE3
— BCCI Women (@BCCIWomen) October 10, 2022
यंदा महिला खेळाडूंध्ये भारताची हरमनप्रीत कौरसह स्मृती मानधना आणि बांगलादेशच्या निगर सुलतानालाही नामांकन मिळाले होते. यात हरमनप्रीतने स्मृती आणि निगरला मागे टाकत पुरस्कार मिळवला आहे. हरमनप्रीतने सप्टेंबरमध्ये 6 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 275 धावा केल्या. यावेळी तिने इंग्लंडविरुद्ध नाबाद 143 धावांची तुफान खेळी देखील केली. यामुळे भारताने इंग्लंडविरुद्ध 3-0 अशी एकदिवसीय मालिका जिंकली होती. तिच्या या दमदार कामगिरीसाठीच तिला यंदाचा “प्लेअर ऑफ द मंथ’चा पुरस्कार देण्यात आला आहे.
“पुरस्कारासाठी नामांकन मिळणे आणि ते जिंकणे ही माझ्यासाठी एक मोलाची कामगिरी आहे. तसेच देशाचे प्रतिनिधित्व करताना मला नेहमीच अभिमान वाटतो आणि इंग्लंडमध्ये ऐतिहासिक एकदिवसीय मालिका जिंकणे हा माझ्या कारकिर्दीतील ऐतिहासिक क्षण होता.
– हरमनप्रीत कौर, भारतीय क्रिकेटपटू
पुरुषांमध्ये पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज महंमद रिझवानला आयसीसी “प्लेयर ऑफ द मंथ’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. वास्तविक, भारतीय अष्टपैलू अक्षर पटेल आणि ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रीन यांनाही पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. परंतु महंमद रिझवान या दोघांनाही मागे टाकत महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
पाकिस्तानी सलामीवीरांसाठी सप्टेंबर महिना चांगला राहिला. सप्टेंबर महिन्यात महंमद रिझवानने 10 टी-20 सामन्यांमध्ये 7 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. आशिया कप 2022 मध्ये त्याने भारत आणि हॉंगकॉंग विरुद्ध 70 पेक्षा जास्त धावांची खेळी होती. याशिवाय त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही शानदार खेळी खेळली होती. त्याचवेळी, तो आयसीसी टी-20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.