भारत व मॉरिशस यांच्यात आफ्रिकेच्या प्रश्नावर मतैक्य
पोर्ट लुईस, दि. 10 – आफ्रिकेच्या समस्यांवर विशेषतः ताज्या घडामोडींवर भारत आणि मॉरिशस यांच्यात संपूर्ण मतैक्य असल्याचे आज पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सर शिवसागर रामगुलाम यांच्यात झालेल्या चर्चेत स्पष्ट झाले. चर्चेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी उभय नेत्यांमध्ये आर्थिक सहकार्य आणि जागतिक प्रश्नांविषयीची धोरणे व दृष्टिकोन यांच्यावर विचारांची देवाणघेवाण झाली.
तथापि भारताची आफ्रिकी प्रश्नाविषयीची भूमिका आधीच स्पष्ट झालेली आहे. स्वातंत्र्य, सन्मान व विकासाची संपूर्ण संधी साध्य करण्यासाठी आफ्रिकी राष्ट्रे करीत असलेल्या प्रयत्नांना भारताने सदैव पाठिंबा दिलेला आहे व यापुढेही भारत पाठिंबा देत राहील.
पोतदारांच्या शिवचरित्राची रूपरेषा निश्चित केली
पुणे – शिवचरित्राविषयीची रूपरेषा निश्चित करण्यात आली असून शिवछत्रपतींच्या जीवनातील मधल्या कालखंडावर विशेष प्रकाश टाकण्यात येणार असल्याचे विश्वसनीयरित्या कळते. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी हे चरित्राचे काम हाती घेऊन या संबंधातील संदर्भग्रंथाच्या टिपणीचे कामास सुरुवात झाली आहे. मी शिवचरित्रात नवीन असे काही सांगणार नाही परंतु चरित्रातील प्रसंगाच्या तपशीलाच्या पार्श्वभूमीवर हे चरित्र कसे वाचनीय होईल याची खात्री पोतदार यांनी दिली.
मराठी भाषिकांनी अन्य भाषा शिकाव्यात
मुंबई – मराठी भाषिकांनी देशातील इतर भाषा शिकाव्यात, असे आवाहन सुप्रसिद्ध मराठी कवी वसंत बापट यांनी केले.