सातारा (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवार राहुल गजानन चव्हाण (रा. वानेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सज्ज आहे.
निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचार्यांचे प्रशिक्षण झाले असून, दि. 12 ते दि. 19 दरम्यान सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून, सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज शंभर रुपयांमध्ये उपलब्ध असून, अर्जांच्या विक्रीसाठी स्वतंत्र टेबलाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हाधिकार्यांच्या दालनासमोर परिषद सभागृहात नामनिर्देशन पत्र तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाची जबाबदारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्यावर असून, 24 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवाराने भरलेल्या नामनिर्देशन पत्राची प्राथमिक तपासणी आठ सदस्यांच्या टीमकडून केली जाणार आहे. निवडणूक लढवणार्या उमेदवाराने पक्षाचे ए आणि बी फार्म नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे आणून देणे बंधनकारक आहे. या फॉर्मवर संबंधित पक्षाच्या पदाधिकार्यांची शाईची सही असणे आवश्यक आहे. फॅक्सद्वारे किंवा झेरॉक्स काढलेली फॉर्मची प्रत स्वीकारली जाणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.