दोन्ही विधानसभेसाठी देव शर्मा यांची नियुक्ती
रेडा- सध्या सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. अर्ज माघारी घेण्याच्य शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. 7) इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. तर मंगळवार (दि. 8) पासून औचारीकपणे प्रचाराला सुरुवात होणार आहे. यासाठी इंदापूर व दौंड या दोन विधानसभासंघात लक्ष ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने देव दत्त शर्मा (भा. प्र. से) यांची सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली असल्याची माहिती इंदापूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंके यांनी दिली.
राज्यात गुरुवार (दि. 3) पासून या निरिक्षकांनी मतदारसंघात आगमन केलेले आहे. निवडणुकीच्या कालावधीमध्ये निवडणूक निरीक्षक हे व्ही. व्ही. आय. पी सर्किट हाऊस (हिरवी इमारत) पुणे येथे वास्तव्यास असणार असून, आवश्यकतेनुसार दोन्ही मतदारसंघाच्या ठिकाणी ते भेटी देणार आहेत. नागरिक, मतदार, उमेदवार यांना जर अडचण असेल तर त्यांना निवडणूक निरीक्षकांना प्रत्यक्ष भेटण्याची वेळ सकाळी 9 ते 10 या एकाच तास असणार आहे. यामध्ये इंदापूर सार्वजनिक बांधकाम उपअभियंता धनंजय वैद्य इंदापूर हे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक यांचे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहे, अशी माहिती इंदापूर विधानसभा सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले.