इंदापूरचा आमदार सक्षम नाही : हर्षवर्धन पाटील

पळसदेव – एकीकडे उजनीचे पात्र, दुसरीकडे नीरा डावा व खडकवासला कालवा असूनही इंदापूरला दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. तालुक्‍यात 60 टॅंकरने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. 12 छावण्या सुरू आहेत. उजनीच्या पाण्यावर नियंत्रण नसल्याने पिके जळून गेली आहेत. इंदापूर तालुक्‍याचे आमदार सक्षम नसल्यानेच तालुक्‍यात दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता केली. यावेळी परिवर्तन करण्याची गरज असल्याचे सांगत 2014 मध्ये केलेली चूक पुन्हा करू नका, असे आवाहनही पाटील यांनी केले.

पळसदेव (ता. इंदापूर) येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजन, लोकार्पण सोहळा व साहित्य वाटप कार्यक्रम हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.

पाटील म्हणाले की, आमदारांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. उजनीच्या पाण्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळात उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने धरणग्रस्तांचे प्रपंच उद्‌ध्वस्त झाले. गाळमोरीतून पाणी सोडण्याचे अधिकार केवळ कॅबिनेटला असताना अधिकारी मात्र कोणाच्याही सांगण्यावरुन पाणी सोडून देतात. या पाण्यासाठी कायदेशीर लढा उभारायला हवा आणि याकरीता आपण तयार आहोत. याशिवाय खडकवासला कालव्याचे पाणी काही दिवसांनी दौंडमधून खाली येणे बंद होईल. नीरा डावा कालव्याचे पाणीही बारामतीतून खाली येणार नाही. यामुळे येत्या काळात इंदापुरकरांना कायम दुष्काळाचा सामना करावा लागेल. यासाठी आपण एकत्रित हक्‍काच्या पाण्यासाठी लढा उभारला पाहिजे.

यावेळी पंचायत समितीचे सभापती करण घोलप, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, माजी पंचायत समिती सभापती सारिका काळे, हनुमंत बनसुडे, अश्‍विनी काळे, तुळशीराम काळे, संतोष काळे, शरद काळे, भूषण काळे, तानाजी काळे, हिराचंद काळे, नंदा बनसुडे, सुनील काळे, धनंजय बनसुडे, सुरेश बनसुडे आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)